अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांचे महत्त्वाचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अनुचित आर्थिक व्यवहार, तैवान सामुद्रधुनीत शांतता आणि सुरक्षेसाठी अमेरिका चीनच्या विरोधात उभा ठाकला आहे. तसेच भारतासारख्या सहकाऱ्यांसोबत स्वत:च्या भागीदारीला मजबूत करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ला बिडेन यांनी संबोधित केले आहे. अमेरिका चीनसोबत प्रतिस्पर्धा इच्छितो, संघर्ष करण्याची आमची इच्छा नाही. आमचा देश (अमेरिका) चीनच्या विरोधात 21 व्या शतकातील प्रतिस्पर्धा जिंकण्यासाठी मजबूत स्थितीत असल्याचा दावा बिडेन यांनी केला आहे.
आम्ही चीनच्या अनुचित आर्थिक पावले आणि तैवान सामुद्रधुनीत शांतता तसेच सुरक्षेसाठी त्याच्या विरोधात उभे ठाकलो आहोत. तसेच सहकारी आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील देश भारत, ऑस्ट्रेलिया, जपान तसच दक्षिण कोरियासोबत स्वत:ची भागीदारी मजबूत करत आहोत. चीन पुढे जात असून अमेरिका मागे पडत असल्याचे कित्येक वर्षांपासून स्वत:च्या रिपब्लिकन मित्रांकडून आणि अन्य लोकांकडून ऐकले आहे. परंतु स्थिती याच्या उलट आहे. अमेरिकाच सध्या जोरदार वाटचाल करत असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वात बळकट आहे. मी अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेचा जीडीपी वाढला आहे. मागील एक दशकात चीनसोबतची आमची व्यापारी तूट नीचांकी स्तरावर आहे. अत्याधुनिक अमेरिकन तंत्रज्ञानांचा वापर चीनच्या शस्त्रास्त्रांमध्ये होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. आम्ही चीन किंवा कुठल्याही अन्य देशाच्या विरोधात 21 व्या शतकातील प्रतिस्पर्धा जिंकण्यासाठी मजबूत स्थितीत आहोत असे उद्गार बिडेन यांनी काढले आहेत.
अमेरिकेत लोकशाही धोक्यात
स्टेट ऑफ द युनियन भाषणात बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शरसंधान केले आहे. अमेरिकेत लोकशाही धोक्यात आहे. काँग्रेस आणि अमेरिकेच्या लोकांना या धोक्याबद्दल सतर्क करू इच्छितो. अध्यक्ष लिंकन आणि नागरीयुद्धापासून आतापर्यंत देश आणि जगात लोकशाही आणि स्वातंत्र्य कधीच अशाप्रकारे धोक्यात आले नव्हते, लोकशाहीवर हल्ले होत असल्याचे बिडेन म्हणाले.