तुलसी गबार्ड यांना महत्त्वाची जबाबदारी
नॅशनल इंटेलिजेन्सच्या संचालकपदी नियुयक्ती : ट्रम्प यांना दाखविला विश्वास
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेले रिपब्लिकन पार्टीचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजेन्स’ (डीएनआय) म्हणून तुलसी गबार्ड यांची निवड केली आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या माजी नेत्या तुलसी गबार्ड यांच्यावर त्यांनी विश्वास दाखविला आहे. गबार्ड या चारवेळा खासदार राहिल्या असून 2020 मध्ये त्या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देखील होत्या. गबार्ड यांना पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये तीनवेळा तैनातीचा अनुभव आहे. तुलसी गबार्ड यांनी अलिकडेच डेमोक्रेटिक पार्टीला रामराम ठोकत रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश केला होता.
माजी खासदार लेफ्टनंट कर्नल तुलसी गबार्ड या डीएनआयच्या स्वरुपात सेवा बजावणार असल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. दोन दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत तुलसी यांनी आमचा देश आणि सर्व अमेरिकनांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढली आहे. अध्यक्षीय पदासाठी डेमोक्रेटिक पार्टीच्या माजी उमेदवार म्हणून त्यांना दोन्ही पक्षांमध्ये व्यापक समर्थन प्राप्त आहे. परंतु आता त्या रिपब्लिकन पार्टीच्या महत्त्वाच्या सदस्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तुलसी या अमेरिकेतील पहिल्या हिंदू महिला खासदार आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात त्या आवाज उठवत असतात. गबार्ड यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. त्यांच्या आईने हिंदू संस्कृतीनुसार स्वत:च्या अपत्यांचे पालनपोषण केले होते. गबार्ड या भारताच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. काँग्रेसच्या सदस्य म्हणून त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती.
हिंदूंच्या अधिकारांसाठी आग्रही
2021 मध्ये बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर गबार्ड यांनी अमेरिकेच्या संसदेत एक प्रस्ताव मांडला होता. 1971 मध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर शाब्दिक हल्ला चढविला होता. 50 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात हजारो हिंदूंची कत्तल केली होती. तसेच हिंदूंचा अनन्वित छळ करत त्यांना देशोधडीला लावले होते, असा आरोप करत गबार्ड यांनी पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
ट्रम्प यांच्या प्रचारात योगदान
डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अध्यक्षीय पदासाठी वादविवादाच्या स्वरुपात पार पडलेल्या चर्चेसाठी गबार्ड यांनी ट्रम्प यांची तयारी करवून घेतली होती. 2020 मध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने अध्यक्षीय पदासाठी गबार्ड यांनी दावेदारी केली असता त्यावेळी कमला हॅरिसही शर्यतीत सामील होत्या. तुलसी गबार्ड आणि कमला हॅरिस यांच्यात पक्षाच्या अंतर्गत चर्चा झाली होती. ज्यात गबार्ड वरचढ ठरल्या होत्या. तुलसी गबार्ड यांनी स्वत:च्या उत्तराद्वारे कमला हॅरिस यांच्यावर मात केली होती. याचमुळे ट्रम्प यांनी चर्चेकरता तुलसी गबार्ड यांची मदत घेणे पसंत केले होते.
ट्रम्प प्रशासनात 4 महिलांना स्थान
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च्या आगामी प्रशासनात चार महिलांना मोठी जबाबदारी दिली आहे. गबार्ड यांना राष्ट्रीय हेर विभागाचे संचालक करण्यात आले आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या प्रतिनिधीपदी एलिस स्टेफॅनिक यांची निवड करण्यात आली आहे. एलिस या ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक आहेत. डकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांना होमलँड सिक्युरिटीची जबाबदारी देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाउसच्या चीफ ऑफ स्टाफ पदाकरता सूजन उर्फ सूजी वाइल्स यांची निवड केली आहे.