अफगाणिस्तानचा आज बांगलादेशविरुद्ध महत्त्वाचा सामना
वृत्तसंस्था/ किंग्सटाऊन
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीकरिता पात्र होण्याची सुवर्णसंधी मिळण्याच्या दृष्टीने भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर भवितव्य अवलंबून असलेल्या अफगाणिस्तानचा आज मंगळवारी सुपर एट सामन्यात बांगलादेशशी सामना होईल. अफगाणिस्तानने शनिवारी बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करून प्रथमच विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या संधी वाढवल्या.
गेल्या वर्षी मुंबईत एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतल्याने अफगाणिस्तानचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारत-ऑस्ट्रेलियाच्या निकालाची पर्वा न करता अफगाण संघ बांगलादेशविऊद्ध त्यांच्या संधी निर्माण करू पाहेल यात शंका नाही. अफगाणिस्तानकडे टी-20 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे कौशल्य आणि मानसिकता आहे यात शंका नाही. त्यांनी हे सिद्ध केले आहे की, विजय मिळवण्यासाठी ते आता फक्त त्यांच्या गोलंदाजीवर अवलंबून नाहीत.
सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने आणि इब्राहिम झद्रानने सनसनाटी फटकेबाजी केलेली आहे. याव्यतिरिक्त अफगाणिस्तान कॅरेबियन खेळपट्ट्यांवरील परिस्थितीचा आनंद घेत आहे. दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंची संख्या जास्त असल्याने त्यांना याकामी मदत झाली आहे. ज्या ठिकाणी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला त्याच ठिकाणी ते बांगलादेशशी लढतील आणि फिरकीसाठी अनुकूल परिस्थिती त्यांना मदत करेल.
दुसरीकडे, बांगलादेशने आधीच हार मानली आहे. त्यांच्याकडे उपांत्य फेरीत जाण्याची किरकोळ संधी असली, तरी ऑस्ट्रेलिया आणि भारताविऊद्धच्या पराभवांमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या फलंदाजीने संघर्ष केलेला आहे. पॉवर हिटर नसल्यामुळेही त्यांना त्रास झाला आहे. सलामीवीर लिटन दास आणि तनजीद खान यांना फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तथापि, तौविद हृदोय आणि लेगस्पिनर रिशाद हुसेन यांनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केलेले आहे.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)