बॉम्बस्फोटातील संशयिताविषयी महत्त्वाचे धागेदोरे एनआयएच्या हाती
ट्रॅव्हल हिस्टरीची माहिती उपलब्ध : बळ्ळारीत तपास
बेंगळूर : बेंगळूरच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपीविषयी तपास यंत्रणेला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. कॅफेमध्ये स्फोट घडविल्यानंतर संशयिताने सुजाता सर्कलमध्ये बस पकडून तुमकूरला प्रयाण केले. तेथून बळ्ळारीला जाऊन मंत्रालय-गोकर्ण बस पकडली. त्यामुळे त्याने भटकळमध्ये आश्रय घेतल्याचा संशय बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयच्या अधिकाऱ्यांना आहे. 1 मार्च रोजी बेंगळूरच्या व्हाईटफिल्डनजीक रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. कॅफेमध्ये स्फोटकांची बॅग ठेऊन पोबारा केलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. आरोपीच्या प्रवासाची माहिती मिळविल्यानंतर एनआयएने बुधवारी रात्रीच बळ्ळारी येथील बसस्थानकाला भेट देऊन माहिती घेतली. त्यांना बळ्ळारी आणि तुमकूर पोलिसांनी तपासात मदत केली. बेंगळूरहून दोन कारमधून दहा अधिकारी बळ्ळारीला रवाना झाले होते. त्यांनी आता भटकळमध्येही तपास सुरू केल्याचे समजते.
संशयिताचे आणखी फोटो जारी
बॉम्बस्फोट हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय बळावल्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आतापर्यंत संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसेल असा एकही फोटो उपलब्ध झाला नव्हता. गुरुवारी एनआयएने आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो आणि रेखाचित्र प्रसिद्धीस दिले आहे.