महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्व
महाराष्टा^तील सत्ताधारी तीन पक्षांमध्ये सुरू असणारी सत्ता स्पर्धा आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण याची दखल देशातील दुसरे सर्वोच्च नेते गृहमंत्री अमित शहा यांना घ्यावी लागली आहे. शहा यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कानपिचक्या देऊन तुमची भांडणे तुम्हाला महागात पडतील असे सुनावले आहे. यानंतर तरी परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा असली तरी एकमेकाला पाण्यात बघणारे हे नेते वरिष्ठांची पाठ फिरताच पुन्हा आपल्या पद्धतीने आपल्या स्पर्धकाचा काटा काढायला मागे पुढे पाहणार नाहीत. केवळ हेच नव्हे त्यांच्यातील स्पर्धेची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रात विरोधकांची सत्ता येईल, महाराष्ट्राची सत्ता मिळाली तर संपूर्ण देशाची सत्ता मिळेल असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या 25 सभांचे नियोजन महाराष्ट्रात करण्यात आले आहे. याशिवाय जेथून निमंत्रण येईल तेथे आपण सभेला जाऊ अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या आधीपासून जाळी टाकण्यास सुरुवात केली आहे तर ज्येष्ठ नेते शरद पवार महायुतीतील नाराज मंडळींना आपल्या पक्षात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. कागलच्या समोर गीत गाडगे यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील त्यांच्या हाताला लागतील अशी चिन्हे आहेत शिवाय पश्चिम महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर ते धमाके पडतील अशी स्थिती आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किमान पाच लोक पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असे म्हटले आहे. सत्ता असताना अशी स्थिती निर्माण झालेली पाहणे आणि ती प्रदेशाध्यक्षांनी मान्य करणे याला अगतिकता म्हणतात. राज्यातील सत्तेचा सर्वात मोठा दावेदार असणारा भाजप सध्या नेतृत्वाच्या गर्तेत सापडला आहे. सामूहिक नेतृत्व थोपवले जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढते प्रस्थ आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याविषयीची नाराजी, त्यात भाजपच्या विद्यमान आमदारांना निवडणूक सर्वेंचा दाखला देऊन केले जाण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी दिसून येऊ लागल्याने राज्यातील अनेक मतदारसंघात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेपोटी संघर्ष तीव्र होण्याची लक्षणे आहेत. आपले कोण आणि परके कोण याकडे न पाहता आपल्या आडवा येणाऱ्या प्रत्येकाची जिरवणे हा यापुढे महाराष्ट्रातील नेत्यांचा मुख्य कार्यक्रम ठरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका यंदा बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने जाऊ लागतील की काय? अशा शंकेचे वातावरण निर्माण होत आहे. नेत्यांचे परस्परांतील वाढलेले संघर्ष, एकमेकांचे पाय खेचण्यासाठी सुरू असणाऱ्या खेळ्या आणि सत्ता टिकवण्याच्या दबावपोटी घेतले जात असणारे निर्णय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये जी जुंपलेली आहे, ती परिस्थिती पाहता या निवडणुका सहजासहजी होतील अशी लक्षणे दिसत नाहीत. सर्वसामान्य माणसांनी यातून काय धडा घ्यायचा हा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे पोलीस यंत्रणा आहे. ज्यांना ही परिस्थिती हाताळायची आहे, त्या यंत्रणेच्या हतबलतेचे दर्शन प्रत्येक घटनेमध्ये होत आहे. मालवणमध्ये जेव्हा युती आणि आघाडीचे नेते समोरासमोर आले तेव्हा पोलिसांना नेमके करायचे काय? असा प्रश्न पडला. ती स्थिती राज्यभर सर्वत्र दिसत आहे. पूर्वी अधिकाऱ्यांच्या समोर दोन नेत्यांचे शाब्दिक मतभेद जरी झाले तरी त्याला फार गांभीर्याने घेतले जायचे. इथे नेते ज्या टोकाची भाषा बोलत आहेत आणि ज्या पद्धतीने एकमेकांच्या समोर येत आहेत त्यावरून त्यांना लोकशाही प्रक्रियेऐवजी आपल्या पद्धतीने विरोधकांचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे दिसू लागले आहे. त्यात युती आणि आघाडीमधील परस्पर वाद ही आणखी एक वेगळीच बाब. यातून विद्यमान सरकारमधील मंत्र्यांची आणि आमदारांची जुंपलेली पाहायला मिळत आहे. राज्याच्या सत्तेवर मांड ठोकण्यासाठी प्रत्येकजण सिद्ध झाला आहे. प्रत्येकाने त्यासाठी आपापली यंत्रणा कामी आणली आहे. स्तुती पाठकांच्या आणि दुसऱ्याचे दोष काढणाऱ्यांच्या झुंडी आपापले काम चोखपणे बजावून प्रतिमावर्धन आणि बदनामीच्या कामगिरीत गुंतले आहेत. या प्रतिमावर्धनाच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या बदनामीच्या खेळात कोणीही मागे नाही. प्रत्येकाने समाज माध्यमाचा भरभरून उपयोग करत लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात विष पेरण्याचे काम सुरू केले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणाला आजपर्यंत देशपातळीवर एक महत्त्व निर्माण झालेले आहे. इथले राजकारणी सुसंस्कृत राजकारण करतात आणि विधायक मार्गाने प्रश्नांची उकल करून समाजाचे हित साधतात, हे करताना ते परस्परांचा सन्मान करतात आणि त्यांचे महत्त्व जाणून त्यांच्याशी वागतात अशी महाराष्ट्रातील राजकारणाची आतापर्यंतची देशात ओळख आहे. दिल्लीत गेलेला महाराष्ट्राचा राजकारणी एक तर तिथल्या वातावरणात रुळत नाही आणि रुळला तर मित्रमंडळी जमवल्याशिवाय राहत नाही अशी आतापर्यंतची महाराष्ट्राची ओळख आहे. देशात सत्तेच्या आणि विरोधी राजकारणामध्ये महाराष्ट्रातील ज्या महनीय व्यक्तींनी योगदान दिले त्यांचे नाव देशभर नेहमीच आदराने घेतले जाते. असे असताना त्यांचे आजचे अनुयायी ज्या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे त्यांना समज देण्यासाठी परराज्यातील नेत्यांना येऊन कानपिचक्या द्याव्या लागतात हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अवमूल्यन आहे. सत्तेचे अंतिम ध्येय जर लोकांचे हित असेल तर त्या हितासाठी सत्ता मिळवणारे नेते परस्परात असे भांडले नसते. त्यांचे भांडण नळावरच्या भांडणाच्याही खालच्या पातळीवर चालले आहे. त्यातून आता करमणूक देखील होत नाही. अशा स्थितीत आपले अधिक अवमूल्यन करून घेण्याच्या नादात या नेत्यांनी झाकली मूठ कायम राखावी महाराष्ट्राच्या जनतेवर आपला फैसला सोडावा असे म्हणणेही धाडसाचे ठरत आहे. त्यामुळे आता यांना आवरा असे या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागेल आणि नेत्यांनाही पुन्हा पुन्हा कानपिचक्या द्याव्या लागतील हेच खरे.