कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानी वस्तूंची आयात पूर्णपणे बंद

06:55 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात पाकिस्तानी वस्तूंचा एक कणही विकला जाणार नाही : केंद्र सरकारने जारी केले आदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घातली आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात शनिवारी अधिसूचना जारी केली. पाकिस्तानची कोंडी करताना सुरुवातीला सिंधू जलवाटप करार स्थगित करून पाणीकोंडी करण्यात आली. त्यापाठोपाठ आता कुरिअर सेवेवरही बंदी आणली आहे. तसेच आणखी एक दणका देताना पाकिस्तानी झेंडे असलेल्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश निषिद्ध केला आहे. या सर्व निर्णयांच्या माध्यमातून पाकिस्तानची पूर्णपणे ‘नाकाबंदी’ करण्याचा प्रयत्न भारताने चालवला आहे.

भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेकविध निर्णय घेतले. भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व वस्तूंवर पूर्णपणे बंदी घातली आहे. म्हणजेच पाकिस्तानमधून आता कोणतीही वस्तू भारतात येणार नाही. पूर्वी थेट आयात आणि निर्यात बंद होती, परंतु आता अप्रत्यक्ष आयात बंद करण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. हा पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे. यासोबतच भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांच्या आगमनावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच भारतीय जहाजेही पाकिस्तानी बंदरांवर जाणार नाहीत, असे बंदरे आणि जहाज वाहतूक मंत्रालयाने सांगितले.

‘पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल’, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. यासंदर्भात परराष्ट्र व्यापार धोरण (एफटीपी) 2023 मध्ये एक तरतूद जोडण्यात आली आहे. यामध्ये पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने पाकिस्तानमधून येणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घालण्यात येत आहे. 2 मे रोजीच्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या वस्तू

दोन्ही देशांमधील व्यापार बंदीपूर्वी भारत प्रामुख्याने कापूस, रसायने, अन्न उत्पादने, औषधे आणि मसाल्याचे पदार्थ निर्यात करत होता. याशिवाय चहा, कॉफी, रंग, कांदा, टोमॅटो, लोखंड, स्टील, साखर, मीठ आणि वाहनांचे सुटे भाग यासारख्या वस्तूही अन्य देशांमधून पाठवल्या जात होत्या.

पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या वस्तू

पूर्वी पाकिस्तानातून सिमेंट, जिप्सम, फळे, तांबे आणि मीठ यांसारखी उत्पादने आयात केली जात होती. परंतु 2019 नंतर आयात जवळजवळ शून्य झाली. 2024 मध्ये भारताची पाकिस्तानमधून आयात फक्त 4.8 दशलक्ष डॉलर्स होती. भारत केवळ सैंधव मीठ आणि मुलतानी माती सारख्या आवश्यक वस्तू मागवत होता. परंतु, आता हे देखील पूर्णपणे थांबेल.

भारत-पाकिस्तानमधील थेट व्यापार

पुलवामा हल्ल्यापूर्वी, 2008-2018 दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सुमारे 7,500 कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. या माध्यमातून 66.4 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तथापि, 2019 मध्ये गुप्तचर अहवालांमध्ये बेकायदेशीर शस्त्रs, बनावट चलन आणि अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे दिसून आल्यानंतर भारताने हा मार्ग देखील बंद केला होता.

2024 मध्ये अप्रत्यक्ष व्यापार

2024 मध्ये दोन्ही देशांमधील अप्रत्यक्ष व्यापार 1.21 अब्ज डॉलर्स (सुमारे 10,000 कोटी रुपये) पेक्षा जास्त होता. हा व्यापार 2018 मधील 2.35 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीपेक्षा कमी आहे. एकंदर भारताची निर्यात जास्त असून पाकिस्तानमधून होणारी आयात नगण्य आहे.

भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना बंदी

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने कडक आदेश जारी केला आहे. आता, पाकिस्तानी ध्वज फडकवणारे कोणतेही जहाज भारतातील कोणत्याही बंदरात येऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे, भारतीय जहाजे देखील पाकिस्तानी बंदरांवर जाणार नाहीत. हा निर्णय मर्चंट शिपिंग अॅक्ट, 1958 अंतर्गत घेण्यात आला आहे. हा नियम तात्काळ लागू झाला असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. जर कोणत्याही विशिष्ट प्रकरणात शिथिलता आवश्यक असेल तर त्याचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल.

सर्व प्रकारच्या पोस्टल, पार्सल सेवांवर बंदी

भारताने पाकिस्तानला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवा बंद केल्या आहेत. आता पोस्ट आणि पार्सल हवाई किंवा जमिनीच्या मार्गाने पाठवता किंवा प्राप्त करता येणार नाहीत, अशी माहिती शनिवारी देण्यात आली. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध एकामागून एक पावले उचलत आहे. पोस्ट आणि पार्सलवर बंदी घालण्याचा निर्णय त्याच मालिकेचा एक भाग आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article