इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे आयात बिल वाढले
जवळपास 14 टक्क्यांच्या वाढीची नोंद: भारत आत्मनिर्भर कसा होणार
नवी दिल्ली :
आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत सरकार देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. परिणामी, 2024 च्या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि उत्पादनांची आयात कमी झाली. परंतु 2025 च्या आर्थिक वर्षात परिस्थिती बदलली.
यामध्ये अॅपल, सॅमसंग, एलजी, हायर, लिनोवा, व्हर्लपूल आणि मोटोरोला सारख्या सुमारे डझनभर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1.21 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे घटक आणि उत्पादने आयात केली. 2024 च्या तुलनेत ही वाढ 13 टक्केपेक्षा जास्त आहे.
एका अहवालानुसार, या कंपन्यांच्या नवीनतम नियामक फाइलिंगमधून ही माहिती समोर आली आहे. महागड्या सुट्या भागांच्या आयातीमुळे आणि कमकुवत रुपयामुळे ही वाढ झाल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. तथापि, सरकारची ‘मेक इन इंडिया’ मोहिम असूनही, 2018-19 पासून बहुतेक कंपन्यांसाठी आयातीचे मूल्य कमी झालेले नाही. या कंपन्यांचे एकूण आयात बिल केवळ आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6 टक्क्यांनी कमी झाले.