For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यसनाधिनता थोपविण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवा

10:07 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
व्यसनाधिनता थोपविण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवा
Advertisement

खानापूर तालुक्यातील पोलिसांकडून धडक मोहिमेची गरज

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. याकडे खानापूर पोलिसांचा साफ कानाडोळा होताना दिसत आहे. तसेच तालुक्यात गांजा, जुगार, मटका, सट्टाबाजार, सावकारी कर्ज यासह इतर अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय असल्याची चर्चा होत आहे. याबाबत अलीकडे झालेल्या काही घटनांतून निदर्शनास येत आहेत. त्यामुळे खानापूर पोलिसांचे काय चालले आहे, अशी चर्चा सुरू आहे.

शहरासह तालुक्यात तरुण आणि पौगंडावस्थेतील मुले गांजासह इतर व्यसनाच्या आहारी गेली आहेत. गांजासह इतर नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. गेल्या काही वर्षात शहरासह तालुक्यातील अनेक व्यसनाधिन तरुणांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. तसेच काही व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांचा मृत्यूही झालेला आहे. यासाठी तालुक्यातील राजकीय नेतृत्व करणाऱ्यांनी तसेच समाजसेवकांनी याबाबत काही व्यसनमुक्तीचे उपक्रम राबविणे, जागृती करणे गरजेचे आहे. यात माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनीही तालुक्याचे नेतृत्व केलेले आहे. तसेच त्यांच्या अंजलीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून इतर बरेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी त्यांनी पौगंडावस्थेतील आणि विद्यार्थी दशेतील मुले गांजासह इतर व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करत आहेत. यासाठी त्यांनी काही उपक्रम हाती घ्यावेत. तसेच माजी आमदार अरविंद पाटील हेही तरुण आणि युवकांमध्ये प्रिय आहेत. त्यांच्या पाठिमागे तरुणांचा लोंढा सतत असतो. यासाठी त्यांनीही या व्यसनमुक्तीसाठी काही करणे गरजेचे आहे.

Advertisement

सध्या आमदार असलेले विठ्ठल हलगेकर हे स्वत: शिक्षक आहेत. तसेच ते एका मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि चालक आहेत. त्यांनीही तालुक्यातील वाढत असलेली व्यसनाधिनता आणि गुन्हेगारीकरण थोपविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील सामाजिक संघटनांनीही या वाढणाऱ्या व्यसनाधिनतेचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा तरुण पिढीचे भविष्य अंधकारमय आहे. खानापूर शहर आणि तालुका शांतता, सांस्कृतिक प्रिय, सलोखा जपणारा तालुका म्हणून नावारुपाला आलेला आहे. असे असताना तालुक्यात काही वर्षापासून अंमली पदार्थांच्या व्यसनाधिनतेमुळे अनेक युवक आणि पौगंडावस्थेतील मुले या व्यसनाच्या आहारी गेल्याने पालक हतबल झालेले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी जर या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात काही उपाययोजना केल्या नसल्यास तालुक्याचे भविष्यच उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यासाठी या अंमली पदार्थाचे व्यसन थोपविण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

या विरोधात खानापूर पोलीस धडक मोहीम राबवत नसल्याने गांजासह इतर पदार्थ तरुणांना आणि पौगंडावस्थेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. तसेच शहरासह तालुक्यातील मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही व्यसन करण्याची ठिकाणेही ठरलेली आहेत. ही मुले आपल्या सहकाऱ्यांसह येऊन व्यसन करत आहेत. या व्यसनाच्या तलप पूर्ततेसाठी पैसा कमी पडल्यास लहानसहान चोऱ्याही होत आहेत. त्यामुळे ही मुले गुन्हेगार जगताकडे वळत आहेत. व्यसनाच्या आहारी गेल्याने तंटे, मारामारी या प्रकरणांना तालुक्यात ऊत आला आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने या युवकांना आपण काय करत आहोत. याचेही भान रहात नसल्याने अनेक गुन्हे घडत आहेत. अशा अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या मुलांवर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

जुगार, क्रिकेटचा सट्टा बाजार, मटका धंद्यांनाही ऊत

शहरासह तालुक्यात जुगार, क्रिकेटचा सट्टा बाजार,. मटका या धंद्यांनाही ऊत आला असून मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व कारभार चालवले जातात. उत्तर कर्नाटकात व खानापूर तालुक्यात सध्या मटका मोठ्याप्रमाणात चालला असून याबाबतची सर्व माहिती पोलिसांना आहे. मात्र पोलिसांकडून या विरोधात कोणतीच ठोस कारवाई आजपर्यंत झालेली नाही. मटकाबुकी मोबाईलवरुन आपला व्यवसाय चालवत आहेत. यासाठी मटका घेणारे आणि खेळणारे यांच्यात संगनमत असून योग्यवेळी मोबाईलवरुन आकडे आणि पैसे पाठवले जातात. तसेच क्रिकेट मॅचवरही मोठ्याप्रमाणात बेटींग लावले जाते. ही मॅच बेटींग घेणारे ठराविक लोक आहेत. मटका आणि बेटींग या सर्व अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना आहे. तसेच सावकारी कर्ज देणारे शहरासह तालुक्यात मोठ्याप्रमाणात आहेत. यांचाही व्यवसाय वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे. मात्र याबाबत कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे हे व्यावसायिक राजरोसपणे आपला अवैद्य व्यवसाय खुलेआम चालवत आहेत. मटक्यामुळे अनेकजण भिकेकंगाल झालेले आहेत. मात्र बुक्की आणि यांना अभय देणारे गलेलठ्ठ पैसा कमवत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता तालुक्यातील आजीमाजी लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवी संघ संस्थांनी       खानापूर तालुक्यातील अवैद्य धंदे आणि व्यसनाधिनता थोपविण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ राजकारण्यांना आणि समाजसेवकांना माफ करणारा नाही.

Advertisement
Tags :

.