बालविकास योजनांची अंमलबजावणी करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना
बेळगाव : बालविकास योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून योजनांची योग्य ती अंमलबजावणी करा, अशी सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केली. महिला व बालविकास खात्याच्या विविध योजनांची प्रगती आढावा बैठक शनिवारी पार पडली. यावेळी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार अभियान उत्तमपणे राबवा. तसेच बालकांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मातृवंदना योजना यासह अंगणवाडी केंद्रांमध्ये इतर योजनांसाठी जनजागृती करा. त्याबरोबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अंगणवाडी केंद्रांमध्ये लोकप्रतिनिधीसह पालकांची बैठक बोलाविण्यात यावी. याबाबतही सीईओ राहुल शिंदे यांनी सूचना केल्या. याप्रसंगी महिला व बाल कल्याण खात्याचे सहसंचालक नागराज आर., रवी बंगरप्पणावर, आण्णाप्पा हेगडे, प्रवीणा मठपती, डॉ. चेतना कंकणवाडी आदी उपस्थित होते.