दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू करा
उपराज्यपालांचा केजरीवाल सरकारला आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानीत (दिल्ली) केंद्राची आयुष्मान भारत योजना लागू करा, ही योजना लागू नसल्याने गरीब रुग्णांना उपचार करवून घेण्यास त्रास होत असल्याचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सांगितले आहे. यावर राज्याचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी उपराज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे.
उपराज्यपालांना वस्तुस्थिती माहित नसावी. दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये भाजपशासित राज्यांमधून लोक येत आहेत. आयुष्मान भारत अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या भाजपशासित राज्यांमधील रुग्णालये आणि दिल्लीतील रुग्णालयांची तुलना उपराज्यपालांनी करून पहावी असे भारद्वाज यांनी म्हटले आहे.
उपराज्यपाल सक्सेना यांनी आयुष्मान भारताची फाइल पुन्हा मागविली होती. गरीबांच्या लाभासाठी ही योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशी सूचना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री केजरीवालांना केली आहे. स्वत:ला श्रेष्ठ दाखविणे आणि श्रेय मिळविण्याच्या हव्यासामुळे लोकांच्या आरोग्यासारखा महत्त्वाचा मुद्दा बाजूला पडल्याची टिप्पणी उपराज्यपालांनी फाइलवर केली आहे.