Karad Crime : तोतया पोलिसाचा वृद्धास 50 हजाराला गंडा
कराडनजीक सैदापूर परिसरातील घटना
कराड : शहरातील सैदापूर परिसरात एका अनोळखी इसमाने पोलीस असल्याचे भासवून निवृत्त व्यक्तीची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हातचलाखीने लंपास केली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार पांडुरंग किसन इंगळे (वय ६६, रा. सिल्वर पाम सोसायटी, सैदापूर, विद्यानगर, कराड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर सकाळी सातच्या सुमारास ते मासे आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. डेंटल कॉलेजसमोरून मासे घेतल्यानंतर ते सकाळी साडेसातच्या सुमारास शरण्या मेडिकलजवळ आले असता, एका ४० ते ४५ वयोगटातील, उंच व मध्यम बांध्याच्या इसमाने त्यांना अडवले.
या इसमाने आपण पोलीस असल्याचे सांगून आयडी कार्ड दाखवले. रात्री एसजीएम कॉ लेजसमोर दोन माणसे पिस्तल व दोन लाख रुपये घेऊन पकडली आहेत. साहेबांनी तपास सांगितला आहे, तुम्ही सोन्याची चेन घालून फिरू नका, ती मी रुमालात बांधून देतो, असे सांगून त्याने इंगळे यांच्याकडील सोन्याची चेन, पाकीट व चावी घेतली. त्याने चेन रुमालात बांधल्याचे दाखवून ती रुमालाची घडी इंगळे यांच्या हातात दिली आणि दुचाकीवरून निघून गेला.
घरी जाताना इंगळे यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यात फक्त पाकीट व चावी होती, सोन्याची चेन मात्र नव्हती. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चेन अंदाजे ११ ग्रॅम वजनाची असून किंमत सुमारे ५० हजार रुपये इतकी आहे. गुन्हा या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी इसमाचा शोध सुरू केला आहे. इंगळे यांनी सांगितले की, "तो इसम पुन्हा दिसल्यास मी त्याला नक्की ओळखेन."