उत्सवकाळात रस्त्यांच्या खोदाईने वाहतूक-व्यापारावर परिणाम
रामलिंगखिंड गल्लीत रस्ता बंद केल्याने गैरसोय
बेळगाव : हेमू कलानी चौकापासून कोनवाळ गल्ली कॉर्नरपर्यंत एलअॅण्डटी कंपनीकडून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. खोदकामातील माती काढण्यासाठी काही काळासाठी रस्ता बंद करण्यात आल्याने कोनवाळ गल्ली कॉर्नर परिसरात प्रचंड गर्दी झाली. ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर काम सुरू असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. सण-उत्सवांच्या काळात शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे अशावेळी शहराच्या मध्यवर्ती भागात विकासकामे राबवू नयेत, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विकास आढावा बैठकीत करण्यात आली होती. परंतु, जलवाहिन्या घालण्याचे काम मागील आठवडाभरापासून सुरू असल्याने रामलिंगखिंड गल्ली येथील रस्ता वरचेवर बंद केला जात आहे. शहापूर, वडगाव, जुने बेळगाव येथील नागरिक खरेदीसाठी शहरात येताना हेमू कलानी चौकातून येतात. परंतु, काम सुरू असल्याने होणारी वाहतूक कोंडी पाहता खरेदीदार इतर मार्गाने शहरात येत असल्याने कोंडी अधिक वाढत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात करण्यात आल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे उत्सव झाल्यानंतर काम सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.