मिरजेत तब्बल 32 तास विसर्जन मिरवणूक
मिरज :
मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक मोठी आणि सर्वात उशिरापर्यंत चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक म्हणून मिरज शहराने यंदाही रेकॉर्ड कायम ठेवले. यंदा शनिवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. शनिवारी रात्री बारा वाजता डीजे बंद झाल्याने सर्व लहान मूर्त्यांच्या विसर्जनाला वेग आला.
मात्र, मोठ्या मूर्त्यांची संख्या वाढल्याने रविवारी दुपारनंतरही क्रेनच्या सहाय्याने गणेश तलाव, कृष्णा घाट येथे विसर्जन प्रक्रिया सुरू होती. मिरजेचा ऐतिहासिक गणेशोत्सव पाहण्यासाठी सांगली जिह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली होती.

मिरजेतील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणरायाच्या आगमन ते विसर्जनापर्यंत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चर्तुदशीला शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण होते. विसर्जन मार्गावर दुतर्फा गणेश भक्तांची मोठी गर्दी होती. राज्यातून तसेच कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गणरायाचे विसर्जन गणेश तलावात झाले. विसर्जनासाठी महापालिकेने क्रेनची व्यवस्था केली होती. शिस्तबध्दतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन पाहण्यासाठी गणेश तलावाच्या बाजूने गर्दी झाली होती.
शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून गणेश मंडळातील श्रींच्या मूर्तीचे विसर्जन सुरू झाले. सायंकाळी सहा वाजल्यानंतर मोठ्या मिरवणुका सुरू झाल्या. एक एक मंडळ धिम्या गतीने विसर्जनासाठी मार्गस्थ होत होते. मिरज मार्केटमधील हिंदू एकता आंदोलन, मराठा महासंघ, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कमान, शिवसेना शिंदे गटाची कमान, विश्वशांतीची कमान, छत्रपती संभाजी महाराजाची कमान गणेश मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. प्रत्येक कमानीवरून प्रत्येक गणेश मंडळाचे हार, श्रीफळ देवून स्वागत करण्यात येत होते. गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात आसमंत दुमदुमत होता. तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे माजी कामगार मंत्री व आमदार सुरेश खाडे तर जनसुराज्य शक्तीपक्षातर्फे समित कदम यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत होते.
ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विसर्जनासाठी सर्रास मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. याशिवाय लेझीम, झांजपथक, हलगी, नाशिक ढोल, ताशा, ढोली बाजा, बँड या वाद्यांसह काही मंडळांनी मिरवणूक काढली. विसर्जन मार्गावर अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने पाणी, तसेच भोजन व्यवस्था केली होती. त्यामुळे परगावाहून आलेल्या भाविकांची सोय झाली. मिरजपूर्व भागातून अनेक ग्रामस्थ वाहनातून मिरजेतील गणपती विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आले होते. गणेशोत्सवामध्ये नेहमीच आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेले भव्य व आकर्षक स्वागत कमान पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
मिरवणुकीत रस्त्याच्या दुतर्फा खेळण्यांची दुकान, खाद्यांच्या गाड्या तसेच इतर साहित्यांचे दुकानही थाटले होते. मिरजेचा गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. सर्वच भक्तीमय वातावरण आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे शहरात झगमगाट दिसत होता. यावर्षी सर्वच मंडळांनी भव्य गणेशमूर्तीवर भर दिला होता. विसर्जन मार्गावर भव्य गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरले. विसर्जन मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. साध्या वेशातील पोलीस तसेच प्रत्येक चौकात पोलिसांसाठी टेहळणी करण्यासाठी स्टॅन्ड उभे केले होते. उत्साहात आणि आनंदात अनंतचतुर्दशीची गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.