विसर्जन तलाव सज्ज : विद्युत रोषणाईचा झगमगाट
कपिलेश्वर तलावाला विद्युत रोषणाई, शहरात आठ ठिकाणी विसर्जन सुविधा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गणरायांना निरोप देण्याचा दिवस आज येऊन ठेपला आहे. महापालिकेच्यावतीने शहर आणि उपनगर परिसरातील तलाव विसर्जनासाठी सज्ज करण्यात आले असून तलाव परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. श्री विसर्जनासाठी सकाळी दहापासून क्रेन सुविधा उपलब्ध राहणार आहे.
गणरायांना निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याकरिता महापालिकेने गणरायांना निरोप देण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पाचव्या दिवसापासून तलाव विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच परिसर स्वच्छ करून विद्युतदिपाची सुविधा व विसर्जनासाठी दहा क्रेनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
विसर्जन तलावांची रंगरंगोटी करून गणपती विसर्जनासाठी सज्ज करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने तलावाचा परिसर झगमगत आहे. रामेश्वर तलावात श्रीगणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कणबर्गी तलावाजवळ महापालिकेच्यावतीने एक क्रेन तैनात करण्यात येणार आहे. उर्वरित सात क्रेन कपिलेश्वर तलावाजवळ तैनात करण्यात येणार आहेत. तसेच तलाव स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱयांसह विसर्जनाकरिता अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
दूषित काढून भरले शुद्ध पाणी
मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील सांडपाणी मिसळल्याने कपिलेश्वर तलावातील पाणी दूषित झाले होते. गणेशोत्सव विसर्जनात अडथळा निर्माण झाल्याने पाणी उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर तलावातील दूषित पाण्याचा पूर्ण उपसा करण्यात आला असून स्वच्छ पाणी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी गणेशमूर्ती विसर्जनास तलाव सज्ज झाला होता.
मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाचे पाणी रस्त्यावरून कपिलेश्वर जुन्या तलावात मिसळले होते. परिसरातील डेनेजवाहिन्या आणि गटारी तुंबल्याने पाणी निचरा होण्याचा मार्ग बंद झाला होता. परिणामी रस्त्यावरील सांडपाणी तलावात शिरले. तलावाच्या कठडय़ाची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी तलावात मिसळले. गणेशोत्सवामुळे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे. पण दूषित पाण्यात विसर्जन कसे करायचे? असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. सदर पाणी उपसा करण्यासाठी मनपाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी रात्री विद्युतपंप सुरू केले. मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभर पाणी उपसा करून तलावातील संपूर्ण दूषित पाणी काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बुधवारी रात्री नव्याने शुद्ध पाणी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे विसर्जनासाठी गुरुवारी सकाळपासून कपिलेश्वर तलाव सज्ज झाला आहे. नवव्या दिवशी काही भाविक घरगुती गणरायांचे विसर्जन करतात. तलावात स्वच्छ पाणी सोडण्यात आल्याने विसर्जनातील अडचण दूर झाली आहे.
मात्र यापुढे जोराचा पाऊस झाल्यास तलावात सांडपाणी शिरण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे तलावाच्या चारही बाजूच्या कठडय़ांची उंची वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा करावा, पुढील वर्षाच्या आत कठडय़ांचे बांधकाम पूर्ण करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी होणार श्री विसर्जन
- कपिलेश्वर तलाव
- कपिलतीर्थ (नवीन तलाव)
- रामेश्वरतीर्थ (जक्कीन होंड तलाव)
- जुनेबेळगाव कल्मेश्वर तलाव
- अनगोळ, लाल तलाव
- कणबर्गी तलावाशेजारील कुंड
- किल्ला तलावाशेजारील विहीर
- नाझर कॅम्प (केवळ घरगुती गणेशमूर्ती विसर्जन)