सातारा शहरासह जिल्ह्यात गौराई आणि गणपतींचे विसर्जन
सातारा प्रतिनिधी
एक दोन तीन चार गणपतींचा जयजयकार, गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पांना आरती करुन घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला. सातारा शहरासह जिल्ह्यात गौराई आणि गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौराईच्या विसर्जनामुळे अनेक गावांमध्ये महिलांनी झिम्मा, फुगड्यांचे फेर धरले होते.
सातारा जिह्यात बुधवारी गौराईंना पुरण पोळ्यांचा नैवैद्य दाखवण्यात आला. त्याचवेळी सायंकाळी अनेक गावामध्ये माहेरवाशीन आलेल्या महिलांनी गौराई निमित्ताने घरोघरी हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला. घरोघरी गौराईच्या समोर लाडकी बहिण, विश्वकर्मा योजना यासह विविध योजनांचे देखावे करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी मात्र गौराईचे दोरे घेण्याचा कार्यक्रम प्रत्येक घरात पार पडला. गौराईचा विसर्जनाचा कार्यक्रमानंतर दुपारी अनेक गावात झिम्मा फुगड्यांचे खेळ सुरु होते. तर दुपारपासून सातारा शहरासह जिह्यात घरगुती पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरु होते. शहरात पालिकेच्यावतीने विसर्जनासाठी कृत्रिम हौद केले होते. संगम माहुली येथे गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
देखावे पाहण्यासाठी होवू लागली गर्दी
गौराईसह घरगुती गणरायाला गणेशभक्तांनी गुरुवारी भावपूर्ण निरोप दिला. त्यानंतर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या मंडळांचे देखावे रात्री सुरू केले. हे देखावे पाहण्यासाठी गर्दी होवू लागली आहे. पावसाने उसंत दिल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह होता. शुक्रवारपासून यामध्ये आणखी वाढ होवून देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून साताऱ्यातील सर्व रस्ते गर्दीने फुलून जातील.