काकती-होनगा परिसरात गणपतींचे विसर्जन
वार्ताहर /काकती
मूळ नक्षत्रावर गौरी गणपतीचे विसर्जन करण्याची मोठी प्रथा असल्याने यावर्षी गुरूवारी सहाव्या दिवशी काकती-होनगा परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या’ अशी लहान-थोरासह बाप्पाला साद घालत भक्तांनी मार्कंडेयनदी काठावर भावपूर्ण निरोप दिला. बुधवारी पाच दिवसाचा तर गुरुवारी मूळ नक्षत्र असल्याने सकाळपासून बाप्पाच्या विसर्जनाला प्रारंभ झाला. काकती येथील थोरला तलाव, मार्कंडेयनदी काठ पुलाजवळ व सकनाथ जवळील नदी काठावर विसर्जनासाठी भक्ताची दिवसभर गर्दी होती. पावसानेही दिवसभर उघडीप दिली होती. यामुळे घरगुती गणपती बाप्पाना निरोप देण्यासाठी शाळेला दांडी मारुन चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. काही भाविक डोकीवर घेऊन फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदाने पायी चालत होते. काही भाविकांनी दुचाकी, कार, टेम्पो घेऊन विसर्जनस्थळी गर्दी केली होती. पारंपरिक पांढरा सदरा परिधान करून घरातील सर्व कुटुंब मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देत होते.