कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रहणकाळात विसर्जन...उन्मादाचे प्रदर्शन!

01:10 PM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत बेळगावकरांमध्ये नाराजी : चंद्रग्रहणाचे वेध सुरू होण्याअगोदर विसर्जन होणे आवश्यक 

Advertisement

बेळगाव : उत्सव हा आनंदासाठी असावा, तो उन्मादाकडे वळू नये, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. तरुण भारतनेसुद्धा याच भूमिकेचा पाठपुरावा केला आहे. मात्र यंदाच्या लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत बेळगावकरांमध्ये नाराजी पसरली आहे. याकडे उत्सवी, हौशी मंडळांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. आपली संस्कृती आपणच जपायची आहे, तिचे गोडवे गाताना या संस्कृतीमध्ये नको ते प्रवाह आणता कामा नयेत. जर संस्कृती जपायची तर त्या संस्कृतीमधील नियम आणि नेम दोन्ही जपायची ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. मात्र, यंदा या दोन्हीकडे अनेक (अपवाद वगळता) मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. सांगण्याचा मुद्दा असा की यंदा ग्रहण काळामध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन केले गेले. जे ना आपल्या संस्कृतीत बसते ना आपल्या शास्त्रात बसते. दरवर्षी विसर्जनाची वेळ वाढतच चालली आहे. मात्र, साधारण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विसर्जन पूर्ण होते. हळूहळू ही वेळ वाढतच चालली व संध्याकाळपर्यंत विसर्जन सुरू राहिले.

Advertisement

यंदा मात्र, चक्क रात्र झाली. मुख्य म्हणजे ग्रहणाचे वेध लागले. तरीसुद्धा अनेक मूर्तींचे विसर्जन सुरूच होते. रविवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान चंद्रग्रहणाचे वेध सुरू झाले. वास्तविक तत्पूर्वी विसर्जन होणे आवश्यक होते. रविवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान चंद्रग्रहणाचे वेध सुरू झाले. ग्रहणाचा स्पर्श रात्री 9.57, ग्रहणाचा मोक्ष रात्री 1.27 मिनिटांनी होता. हिंदू पंचांग आणि संस्कृतीनुसार ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य वर्ज्य आहे. बेळगावसह कर्नाटकातील प्रमुख मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. ग्रहणाच्या काळात देवदर्शन बंद ठेवण्यात आले होते. याचा कसलाच परिणाम बेळगावात पाहायला मिळाला नाही. ग्रहणाच्या वेळेलाच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक व विसर्जन सुरू होते. मंडळांनी किंवा कार्यकर्त्यांनी हेतूत: उशीर केला असे म्हणता येणार नाही. किंबहुना ग्रहण असण्याची कल्पनाही त्यांना नसावी. परंतु जेव्हा आपल्या संस्कृतीनुसार आपण धार्मिक परंपरा जोपासतो तेव्हा त्या जपणे आवश्यक आहे. आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करणे हे निश्चितच भूषणावह नाही. ग्रहणकाळात सर्व शुभगोष्टी करणे ताज्य मानले जाते, इतकेच नव्हे तर मंदिरांमधील देवांचे गाभारेसुद्धा बंद करून ठेवले जातात. अशावेळी विघ्नहर्त्याचेच विसर्जन ग्रहणकाळात केल्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

नागरिकांनीच ठोस भूमिका घ्यावी

मंडळांमधील चुरस आणि स्पर्धा उत्सवाला गालबोट लागणारी ठरू नयेत याची जबाबदारी उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक मंडळांवर आहे. माझ्या मंडळाची मूर्ती किती मोठी, माझ्या मंडळामध्ये कोण मान्यवर आले, माझ्या मंडळाने सजावटीवर किती लाख खर्च केले, हे मिरवण्याच्या भूमिकेमुळे उत्सवांमध्ये न कळत स्पर्धांचा शिरकाव झाला आहे. सर्वात शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीमूर्तीचे विसर्जन होणार यासाठीसुद्धा स्पर्धा सुरू झाली आहे. ही चुरस बेळगावकरांना वेठीस धरत असेल तर नागरिकांनीच त्याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचे मौन हे अनेक चुकींच्या गोष्टींसाठी घातक ठरत आहे.

कोणी काही करोत, मला काय त्याचे? ही भूमिका बेळगावच्या विकासाला मारक ठरणारी आहे. उत्सवापूर्वी प्रशासन अनेकवेळा बैठका घेते, तेथे अनेक विषयांवर चर्चा होते, डीजे लावू नये, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, आगमन व विसर्जन सोहळा वेळेवर सुरू करून सर्वांच्याच सोयीचा विचार करावा, अशा चर्चा घडत राहतात, परंतु पुन्हा नियम कागदावर आणि मनमानी रस्त्यावर असेच चित्र दरवेळी दिसते. आजपर्यंत बेळगावची श्री विसर्जन मिरवणूक ही वैशिष्ट्यापूर्ण व वैभवशाली म्हणून नावाजली गेली आहे. हाच वारसा पुढे न्यायचा असल्यास मंडळांनी आत्मपरिक्षण करणे ही जितकी काळाची गरज ठरणार आहे, तितकीच ती बेळगावकरांच्या सोयीची आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article