कंग्राळी खुर्द गावातील-शिवारातील वीजतारा-वीजखांब त्वरित बदला
ग्रा. पं. सदस्य-ग्रामस्थांतर्फे हेस्कॉमला निवेदन
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी खुर्द गावातील व शिवारातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा तसेच जुने झालेले विद्युतखांब त्वरित बदलून शेतकरी वर्ग व ग्रामस्थांना दिलासा देण्याच्या आशयाचे निवेदन कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने हेस्कॉम खात्याचे सहाय्यक अभियंते राघवेश एस. यांना नुकतेच देण्यात आले. कंग्राळी खुर्द गावात बऱ्याच ठिकाणचे विद्युतखांब जुने असल्याने ते जीर्ण होऊन खराब झालेले आहेत. तसेच शिवारातसुद्धा अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा असल्याने शेतकरी वर्गाच्या जीवितास धोका आहे. तरी हेस्कॉम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील व शिवारातील वस्तूस्थितीची पाहणी करून जीर्ण खांब व लोंबकळणाऱ्या तारा त्वरित बदलून शेतकरी वर्ग व ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वायरमनचीही त्वरित बदली करण्याची मागणी, अन्यथा...
सध्या कंग्राळी खुर्द गावामध्ये कार्यरत असलेला वायरमन संतोष यांची मोठी मनमानी सुरू असून शेतकरी वर्गाशी उद्धट वागणे सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही तो वाटाण्याच्या अक्षता लावतो. त्यामुळे त्याची येत्या आठवड्यात बदली करावी, अन्यथा त्याला गावात येऊ देणार नाही, असा इशाराही या निवेदनातून हेस्कॉम अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य रमेश कांबळे, प्रशांत पाटील, विनायक कम्मार, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, शेतकरी संघटनेचे भाऊ पाटील, नारायण पाटील, मोहन पाटील, प्रल्हाद पाटील, निंगोजी पाटील, रमेश पाटीलसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.