मजगाव परिसरातील पाणी टंचाई त्वरित दूर करा
पाण्यासाठी भटकंती : नागरिकांतून तीव्र संताप
मजगाव:
उद्यमबाग बेम्को क्रॉस समोरील प्लॉटधारकांनी बेसमेंटसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केल्याने रस्त्यालगतची पाईप लाईन नादुरुस्त होऊन उद्यमबाग, मजगाव, ब्रम्हनगर व इतर वसाहतींना होणारा पिण्याचा पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून येथील नगर सेवकांनी टॅँकर्सने गल्लोगल्ली पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला आहे. परंतु सदर टँकर्सने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिक व महिलावर्गाचे अतोनात हाल होत आहेत. संपूर्ण दिवस पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित मजगाव परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
दोन दिवसात पाणीपुरवठा न झाल्यास घागर मोर्चा
येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महानगरपालिकेवर घागर मोर्चा नेणार असल्याचा इशारा देवस्था पंच कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण यांनी दिला आहे.