मोबाईल टॉवर्सना त्वरित वीज जोडणी करा
जांबोटी-कणकुंबी विभागातील नागरिकांची मागणी : दुर्गम भागातील दूरध्वनी टॉवर अद्याप सोलार यंत्रणेवरच
वार्ताहर/जांबोटी
दुर्गम भागात वसलेल्या गावांना दूरध्वनी सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्र सरकारच्यावतीने खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल) च्यावतीने मोबाईल टॉवर उभारुन दुर्गम भागातील नागरिकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी गैरसोय दूर झाली आहे. मात्र सदर दूरध्वनी टॉवर्सना अद्याप वीज जोडणी करण्यात आली नसल्यामुळे सध्या ही सेवा सोलार यंत्रणेवर सुरू असल्याने पावसाळ्यात ही यंत्रणा ठप्प होत आहे. हेस्कॉमने मोबाईल टॉवर्सला त्वरित वीज जोडणी करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दुर्गम भागातील अनेक गावांना दूरध्वनी सेवा उपलब्ध नसल्यामुळे महत्त्वाचे संदेश देवाण-घेवाण करणे व इतर दळणवळणाच्या सुविधांअभावी या भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत खासदार विश्वेश्वर हेगडे व भाजपा नेते प्रमोद कोचेरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या सहा महिन्यापूर्वी जांबोटी, कणकुंबी भागातील चिखले, गवसे, पारवाड, हुळंद, तळावडे, चापोली, चोर्ला, मुगवडे आदी गावामध्ये भारत दूरसंचार निगमच्यावतीने मोबाईल टॉवर उभारणी करून नागरिकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येत असल्यामुळे वनखात्याकडून मोबाईल टावर्सना भूमिगत केबल तसेच ट्रान्स्फॉर्म बसवून वीजपुरवठा करण्यास मनाईचा आदेश दिल्याने नव्याने उभारण्यात आलेले सर्व टॉवर सोलार यंत्रणेवर कार्यान्वित करून नागरिकांना बीएसएनएलने दूरध्वनी सेवा उपलब्ध करून दिली आहे.
पावसाळ्यात समस्या गंभीर
पावसाळ्यात या भागात बरेच दिवस सूर्यदर्शन होत नाही तसेच ढगाळ वातावरण व अंधारामुळे सोलार यंत्रणा कार्यान्वित होण्यास अडथळे येत असल्याने टॉवर्सना अपुरा ऊर्जापुरवठा होत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
वनखात्याचे दुर्लक्ष
वास्तविक पाहता बीएसएनएलच्यावतीने मोबाईल टॉवर्सना वीजपुरवठा करण्यास आवश्यक असलेली केबल घालण्यासाठी वनखात्याला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून रक्कम देखील अदा करण्यात आली असल्याचे समजते. मात्र अद्याप वीज जोडणीसंदर्भात कोणत्याच हालचाली नसल्यामुळे दूरध्वनी सेवेत व्यत्यय येत आहे. तरी वनखाते व बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मोबाईल टॉवर्सना त्वरित वीज जोडणी करावी, अशी मागणी माजी एपीएमसी अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.