उत्तराखंडात त्वरित समान नागरी कायदा
वृत्तसंस्था / डेहराडून
उत्तराखंड राज्यात नववर्षापासून समान नागरी संहिता लागू केली जाणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी बुधवारी ही महत्वपूर्ण घोषणा केली. अशा प्रकारे उत्तराखंड हे राज्य समान नागरी संहिता लागू करणारे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे प्रथमच राज्य होणार आहे. गोव्यात स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीपासूनच समान नागरी संहिता लागू आहे. समान नागरी संहितेमुळे समताधिष्ठित समाजाची निर्मिती होणार असून सर्व धर्मांमधील नागरिकांना समान न्याय मिळणार आहे. विशेषत: महिलांना याचा अधिक लाभ होईल असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेसंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. विधानसभेत ही संहिता लागू करण्याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले होते. त्यानंतर 11 मार्च 2024 या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. ही संहिता लागू करण्यासाठीची सर्व सज्जता आता पूर्ण झाली असून जनतेच्या माहितीसाठी विशेष पोर्टल आणि भ्रमणध्वनी अॅपचाही प्रारंभ करण्यात आला आहे. ही आमची आमच्या नागरिकांना नववर्षाची भेट असेल, असेही प्रतिपादन धामी यांनी केले.