अवकाळीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा! आ. विक्रमसिंह सावंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
जत प्रतिनिधी
जत तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तहसिलदार जीवन बनसोडे यांना दिले आहेत. त्यानुसार जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी तलाठी व कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करुन घ्यावेत, असे आवाहन आ. विक्रमसिंह सावंत यांनी केले आहे.
आधीच दुष्काळाच्या उंबरठ्यावर असणार्या जत तालुक्यातील शेतकर्यांच्या या अवकाळी मुळे जखमा आणखी तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे. येळवी, खैराव, माडग्याळ परिसरातील लाखो रुपयांचे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच खैराव येथे झाड कोसळून म्हैस दगावली आहे. या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी व कृषी विभागातील अधिकारी यांना तात्काळ संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत. नुकसाभरपाई देण्यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठविणार असल्याचे आ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.