बिंब-प्रतिबिंब
आरसा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहानपणापासून जीर्ण वृद्धत्वापर्यंत माणूस रोजच आरशात बघत असतो. देहाचे ममत्व आणि नीटनेटके सुंदर दिसणे ही आवड माणसाला जन्मत: असते. आरशाचा जन्म केव्हा झाला कोण जाणे. आरसा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीची एक दंतकथा आहे. एकदा एका माणसाला आरशाचा एक छोटा तुकडा रस्त्यात सापडला. त्यात त्याला त्याचा चेहरा दिसला, पण स्वत:चे प्रतिबिंब कधीच न बघितल्यामुळे त्याला वाटले, आपले स्वर्गस्थ वडील या तुकड्यात कसे काय आले? कारण तो हुबेहूब दिसायला आपल्या वडिलांसारखाच होता. त्याने तो तुकडा घरी आणला आणि माडीवर फडताळ्यावर ठेवून दिला. मात्र तो रोज त्या आरशात स्वत:ला त्याचे वडील समजून दर्शन घेत असे. एक दिवस त्याच्या बायकोला संशय आला. हा रोज माडीवर जाऊन नित्यनेमाने काय करतो? तिने पाळत ठेवली. तिला तो आरशाचा तुकडा सापडला. त्यात तिचा चेहरा तिला दिसला. परंतु स्वत:चे रूप ठाऊक नसल्याने एका बाईचा चेहरा त्यात बघून तिला नवऱ्याचा राग आला. स्वत:च्या अनोळखी प्रतिबिंबाकडे बघून ती म्हणाली, ‘आत्ता कळलं. या सटवीसाठी हे रोज माडीवर जातात.’ आरसा कितीतरी गोष्टींचे शिक्षण माणसाला देतो. सत्य आणि वास्तव यांचे प्रतिबिंब असलेल्या आरशाशिवाय माणसाला क्षणभर करमत नाही. मात्र तो त्याच्यापासून काहीही शिकत नाही.
श्रीरामांचा चंद्रासाठी हट्ट साऱ्यांना ठाऊक आहे. तेव्हा कौसल्या मातेने श्रीरामांना आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून शांत केले. श्रीराम आणि आरसा असा एक अनुबंध संत तुलसीदासांच्या अत्यंत लोकप्रिय आणि सुमधुर गीतामध्ये आहे. ते गाणे आहे, ‘ठुमक चलत रामचंद्र.’ रामाचे मुख म्हणजे आनंदाचा अथांग सागर आहे. रामाची छबी कोणासारखी? तर फक्त त्याच्यासारखीच. कौसल्या मातेने तीट, काजळ, गंध लावून मेखला, पैंजण-सुंकले हे अलंकार घालून रामाला नटवले आहे आणि असा रामचंद्र, ठुमक ठुमक पावले टाकीत राजवाड्यामधल्या रत्नजडित आरशापाशी आला आहे आणि पाहतो तर काय, आतमध्ये एक सुंदर मूल आहे. त्याला हात लावायला गेला की आरसा मध्ये मध्ये करतो. पुन्हा पुन्हा पकडायला गेला तरी तो गवसत नाही. मग रामचंद्र ओठ काढून स्फुंदू लागतो. कौसल्या माता धावत येते. काय झाले माझ्या बाळाला? रामचंद्र त्या आरशातल्या सुंदर मुलाकडे बोट दाखवून म्हणतो, ‘आई तो येत नाही.’ आई हसून म्हणते, ‘अरे बाळा, ते तुझेच प्रतिबिंब आहे. ते खरे नाही. तू खरा आहेस.’ ‘रघुवर छबी के समान रघुवर छबी बनियॉ’.. त्याच्यासारखे दुसरे कोणीही नाही.
श्री नामदेव गाथेमध्ये कृष्णाची बाळक्रीडा वर्णन करताना महाराजांनी ‘राधाविलास’ नावाचे अप्रतिम आख्यान रचले आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, ‘कोणी एकेदिनी श्रीकृष्ण अंगणी । विलोकी नयनी प्रतिबिंब । मातेप्रती तेव्हा म्हणत असे हरी । काढोनी झडकरी देई मज ।श्रीकृष्णालाही श्रीरामांप्रमाणे स्वत:च्या रूपाने मोहात पाडले. प्रतिबिंब काढून दे म्हणून रडणाऱ्या श्रीकृष्णाला यशोदा मातेने हरप्रकारे समजावले, ‘अरे बाळा, प्रतिबिंब असे काढता येत नाही. तू दुसरे काहीतरी माग. पण कान्हा रडायचाच थांबेना. खेळणी दिली, खाऊ दिला, शेवटी पाळण्यात घालून ती त्याला झोके देऊ लागली. तितक्यात तिथे राधा आली. रडणाऱ्या हरीला तिने पाळण्यातून काढून कडेवर घेतले आणि.... ‘राधा म्हणे का तू रडतोसी चाटा ।गोष्टी त्या अचाटा सांगतोसी ।’ कृष्णाचे खरे स्वरूप राधाच ओळखत होती. त्यामुळे श्रीकृष्ण उगा राहिला. ती त्याला खेळवू लागली. पुन्हा पाळण्यात घातला तर ‘रडाया लागला हरी’ ही सगळी कृष्णलीला आहे. त्यामुळे यशोदा माता राधेला म्हणाली, ‘आपुले मंदिरा घेऊन जाय यासी.’ राधेचे तर कामच झाले. ती आनंदाने त्याला घरी घेऊन गेली. राधा ही प्रकृती तर कृष्ण हा परमात्मा. यांचे वर्णन करताना संत नामदेव महाराज हरखून जातात. भक्त ते वाचताना तल्लीन होतात.
श्री दत्त महाराजांनी सूर्याला गुरू केले. सूर्यापासून अवधूतांनी कोणता धडा घेतला हे सांगताना प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात की एक साधासा प्रयोग आहे. एका मोठ्या पात्रात पाणी भरून घ्यावे आणि ते पात्र दिवसा उघड्या, मोकळ्या जागी ठेवावे. त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते. ते पात्र जर उचलून दुसरीकडे ठेवले तर त्या पात्राबरोबर सूर्याचे बिंबही दुसरीकडे जाते. पाण्यात तरंग उठले तर बिंब हलते. बिंबाच्या गतीचा मूळ सूर्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे आत्मा जीवमात्रांच्या देहादी उपाधीत फक्त प्रतिबिंबित होतो. त्याच्यात प्रवेश करीत नाही. आत्मा मुक्त असून केवळ साक्षी आहे. हा धडा सूर्यापासून अवधूतांनी घेतला. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सूर्य प्रतिबिंबाचे अनेक दृष्टांत ज्ञानेश्वरीत दिले आहेत. ईश्वराची सत्ता सर्व ठायी आहे हे सांगताना माऊली म्हणतात, ‘जैसा समुद्र थिल्लर न म्हणता । भलतेथ बिंबे सविता । तैसा ब्रह्मादि सर्वांभूता । सुहृद तो मी?’ समुद्र अथांग पसरलेला आहे. त्याप्रमाणे एक ओढाही आहे. तो घाण आहे परंतु सूर्य जेव्हा आपले प्रतिबिंब धरतीवर टाकतो तेव्हा तो पवित्र, अपवित्र, घाण यांचा विचार करत नाही. नदी, नाले, ओढे सर्वांमध्ये सूर्य आपले प्रतिबिंब टाकतो. तसा परमात्मा सर्व जिवांना निर्माण करून सांभाळतो. सर्वत्र परमेश्वराची सत्ता आहे. तोच खरा मित्र आहे.
एक दृष्टांत अध्यात्म साहित्यामध्ये नेहमी सांगितला जातो. एकदा एक नुकताच जन्मलेला सिंहाचा छावा चुकून मेंढ्यांच्या कळपात गेला. तिथेच तो मोठा होऊ लागला. सभोवती मेंढ्या असल्याने तो त्याचे खरे स्वरूप विसरून त्यांच्याप्रमाणेच म्यां म्यां करू लागला. गवत खाऊ लागला. असाच रानात चरत असताना एक सिंह डरकाळी फोडत त्या कळपात शिरला तेव्हा हा छावा थरथरत मेंढ्यांसारखा आवाज काढत उभा राहिला. त्याच्याकडे पाहून सिंहाला आश्चर्य वाटले. नंतर त्या सिंहाने त्या छाव्याला एका तळ्याकाठी नेले आणि त्याचे प्रतिबिंब त्याला दाखवले. तू मेंढी नसून सिंह आहेस. तू डरकाळी फोडू शकतोस. तुला भ्यायचे काहीही कारण नाही. छाव्याला असा योग्य उपदेश करून स्वस्वरूपाची ओळख सिंहाने करून दिली. पू. शिरीषदादा कवडे म्हणतात, ‘जिवालाही प्रपंचाची सवय जडल्याने तो स्वत:ला प्रापंचिकच समजू लागतो. स्वत:चे ब्रह्मस्वरूप पार विसरून जातो. त्याचा हा भ्रम दूर करण्यासाठी कोणीतरी सिंह भेटावा लागतो. तो सिंह म्हणजे त्याचे सद्गुरू.’
सद्गुरू जिवाचे शिवात रूपांतर करतात. आत्मस्वरूप प्रकट झाले की बुद्धीमध्ये स्वस्वरूपाचे प्रतिबिंब पडते. ते स्वयंभू असलेले स्वरूप प्रकट होते. शिवस्वरूप कळायला अंत:करण शुद्ध असावे लागते. सद्गुरूंच्या कृपेने हे घडू शकते. प्रतिबिंब हे स्वच्छ पाण्यातच दिसू शकते. उपासना आणि सद्गुरूंवर निष्ठा, त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला की आत्मस्वरूप माणसाला कळते. बिंब-प्रतिबिंब कळायला जागृती यावी लागते एवढे मात्र खरे.
-स्नेहा शिनखेडे