इलिना रायबाकिना विजेती
वृत्तसंस्था/ रियाद
2025 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद कझाकस्तानच्या इलिना रायबाकिनाने पटकाविताना टॉप सिडेड साबालेंकाचा पराभव केला.
2022 साली विम्बल्डन विजेतेपद मिळविणाऱ्या रायबाकिनाचे हे तिच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील दुसरे मोठे विजेतेपद आहे. रियादमधील झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रायबाकिनाने साबालेंकाचा 6-3, 7-6 (7-0) असा पराभव केला. रायबाकिना सध्या महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादित सहाव्या स्थानावर आहे. तिने अलिकडच्या कालावधीत 11 सलग विजय नोंदविले आहेत. कझाकस्तानच्या रायबाकिनाने या अंतिम लढतीत साबालेंकाला पहिल्या सेटमध्ये केवळ 3 गेम्स जिंकण्याची संधी दिली. रायबकिनाला या स्पर्धेतील विजेतेपदाबरोबरच 5.2 दक्षलक्ष डॉलर्स बक्षीसही मिळाले. साबालेंकाने आत्तापर्यंत चार वेळेला ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या तर 2022 साली झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत साबालेंकाला गार्सियाने पराभूत केले होते.