होनगा स्मशानभूमीत बेकायदेशीर क्रीडा मैदान
ग्रा. पं.चा कारभार : मैदान बंद करून स्मशानभूमी जैसे थे ठेवण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर/काकती
होनगा ग्रामपंचायतीने होनगा गावच्या स्मशानभूमीत खेळण्यासाठी बेकायदेशीर क्रीडा मैदान तयार केले आहे. संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्रीडा मैदान बंद करून जशी आहे तशी स्मशानभूमी ठेवावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी आणि तालुका तहसीलदार यांना होनगा येथील सर्व समुदायाच्यावतीने शुक्रवार दि. 20 रोजी देण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, होनगा येथील सर्व्हे नं. 237 मोजमाप 7 एकर 1 गुंठ्यात होनगा गावची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत कोणत्याही सक्षम महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय, शासकीय परवानगी न घेता शव पुरलेल्या स्मशानभूमीत सपाटीकरण करून खेळण्यासाठी क्रीडा मैदान तयार करण्यात आले आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा जिजाबाई धुडूम, पीडीओ गंगाधर नाईक, ग्रा. पं. सेक्रेटरी सचिन नाईक आदींनी पंचायत राज आणि महसूल कायद्याचे उल्लंघन केले आहे. खेळाच्या मैदानासाठी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी खेळावयासाठी सुरू केलेले क्रीडा मैदान बंद करून न्याय द्यावे, अशी मागणी केली आहे. या मागणी केलेल्या शिष्टमंडळात गजानन आर. पावले, चांगप्पा यल्लाप्पा धुडूम, बसवंत लक्ष्मण आनंदाचे, राजू रा. पाटील, प्रकाश ईश्वर आनंदाचे आदींनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.