अलिशान वाहनांची परस्पर विक्री, 70 लाखांची फसवणूक
कोल्हापूर :
अलिशान कारची बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांची परस्पर विक्री करुन 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एजंटसह पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सागर हरी देसाई (वय 38 रा. सुदर्शन कॉलनी, टेंबलाईवाडी) यांनी दिली. एप्रिल 2024 ते मे 2024 दरम्यान ही घटना घडली.
एजंट संजय दत्तात्रय हावलदार (रा. त्रिमुर्ती कॉलनी, कळंबा ता. करवीर) निलेश रामचंद्र सुर्वे (शिवाजीनगर खेरबी ता. चिपळून जि.रत्नागिरी), हसन मगदुम जहांगिरदार (रा. कारवानचीवाडी रत्नागिरी), खरेदीदार महंमद हकीम मोहम्मद हाजी (रा. मक्सूद कॉलनी, सिकंदर पार्क, औरंगाबाद), मनिष भैयाजी फुके (कोणी ता. नरखेड, नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर हरी देसाई यांचे चार चाकी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी 2024 मध्ये 1 फॉर्च्युनर आणि 3 क्रेटा वाहनांची खरेदी केली होती. ही वाहने विक्रीसाठी त्यांनी संजय हवलदार, निलेश सुर्वे, हसन मगदुम यांच्याकडे दिली होती. एक महिना ही वाहने या तिघांच्या गॅरेजवर लावून होती. या चारही वाहनांचा व्यवहार झाल्यानंतर संजय हावलदारने सागर माने यांना प्रत्येक वाहनाचे 50 हजार रुपये असे मिळून 2 लाख दिले. उर्वरीत रक्कम खरेदी करणाऱ्या मालकांचे कर्ज प्रक्रिया पूर्ण करुन उर्वरित रक्कम देणार असल्याचे संजय हवालदार व अन्य दोघांनी सांगितले. मात्र दोन महिने होऊनही संजय हवालदार व त्याच्या साथीदारांनी वाहनांची परस्पर करुनही सागर देसाई यांना रक्कम परत केली नाही. यामुळे सागर देसाई यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करत आहेत.
- 4 वाहनांची किंमत 72 लाख रुपये
सागर देसाई याने ही चारही वाहने संजय हवालदार याच्याकडे दिली होती. 72 लाख 25 हजार रुपयांना या चारही वाहनांचा व्यवहार ठरला. या पैकी केवळ 2 लाख रुपयेच सागर देसाई यांना दिले. उर्वरित रक्कम देतो असे सांगून टाळाटाळ केली.
- मुंबई सेंट्रल येथून विक्री
संजय हवालदार, निलेश सुर्वे, हसन जहांगिरदार या तिघांनी फॉर्च्युनर नागपूर येथे, एक क्रेटा औरंगाबाद येथे, तर दुसरी पुणे येथे विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. अन्य एका क्रेटा कारचा शोध सुरु आहे. या चारही कारची विक्री मुंबई सेंट्रल येथून आरटीओमधील एजंटना हाताशी धरुन केल्याचे समोर आले आहे.
- बोगस कागदपत्रे तयार
संजय हवालदार याने कारची विक्री करण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार केली होती. या चारही वाहनांची मुळ कागदपत्रे सागर देसाई यांच्या नावानेच असल्याचे समोर आले आहे. मात्र तरीही या वाहनांची विक्री केली कशी याचा शोध पोलिसांनी घेतला असता, या चारही वाहनांच्या मुळ मालकांकडून आपण खरेदी केल्याचे भासवून या वाहनांची विक्री करण्यात आली.