छापा टाकून अंगणवाड्यांचा बेकायदा पौष्टिक आहार जप्त
कारवार : अंगणवाड्यांना मोफत देण्यात आलेला पौष्टीक आहार बेकायदेशीरपणे खरेदी करून साठा करून ठेवण्यात आलेल्या स्थळावर छापा टाकून लाखो रुपये किंमतीचा पौष्टीक आहार जप्त करण्यात आला. ही कारवाई हल्याळ तहसीलदार आणि पोलिसांनी संयुक्तपणे हल्याळ तालुक्यातील बी. के. हळ्ळी येथे केली. या प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे सहदेव रूद्राप्पा गौड (रा. बी. के. हळ्ळी) आणि लक्ष्मण निंगप्पा हुनगुंद (रा.देशपांडे नगर, हल्याळ) अशी आहेत. या प्रकरणी विष्णू मिसाळे नावाची व्यक्ती फरारी झाली आहे. फरारी झालेली व्यक्ती एका राजकीय पक्षाचा नेता आहे, असे सांगण्यात आले. फरारी झालेल्या व्यक्तीचा शोध हल्याळ पोलीस घेत आहेत. अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणारा पौष्टीक आहार अनधिकृत खरेदी करून आहाराचा साठा ठराविक ठिकाणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर हल्याळचे तहसीलदार प्रविण हुच्चन्ननावर आणि मंडळ पोलिस निरीक्षक जयपाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आहार निरीक्षक संतोष शिवाजी तोंडले यांनी हल्याळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू मिसाळे हाच असून त्याला ताब्यात घेण्यासाठी हल्याळचे उपनिरीक्षक विनोद रेड्डी प्रयत्नशील आहेत.