बेकायदेशीर होमस्टे, रिसॉर्ट्सना परवानगी नाही
वनमंत्री ईश्वर खंड्रे यांचे स्पष्टीकरण : तक्रार केल्यास कठोर कारवाई, राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यांमुळे सरासरी 55-60 लोक मृत्युमुखी
बेंगळूर : राज्यातील कोणत्याही वनक्षेत्रात राज्य सरकारने बेकायदेशीर होमस्टे, रिसॉर्ट्स किंवा बेकायदेशीर दगड उत्खननाला परवानगी दिलेली नाही, असे वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी स्पष्ट केले. चामराजनगर येथील जिल्हा पंचायत सभागृहात रविवारी आयोजित वन समस्यांवरील शेतकरी आणि जनसंपर्क कार्यक्रमात ते बोलत होते. एखाद्यावेळेस वनक्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन, होमस्टे आणि रिसॉर्ट्स चालविल्या जात असल्याची स्पष्ट तक्रार आली तर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मंत्री खंड्रे पुढे म्हणाले, शेकडो वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष सुरू आहे. आता वन्यजीवांची संख्याही वाढल्यामुळे संघर्ष वाढत आहे. स्थानिक जनता आणि शेतकऱ्यांचा सल्ला आणि मते घेऊन यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. वन खात्याकडून यापूर्वीच दोन तज्ञ समित्या स्थापन केल्या आहेत. मानवी वस्तीत वन्यजीव येत असल्याने याचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, शेतकरी आणि जनतेने दिलेल्या सर्व सूचना आजच्या बैठकीत संकलित केल्या जातील. त्यावर चर्चा करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
वन्यजीवांमुळे पिकांचे आणि पशुधनाचे नुकसान झाल्यास भरपाई वाढवावी, अशी मागणी आहे. मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा केली जाईल. 1972 मध्ये बंडीपूरमध्ये केवळ 12 वाघ होते. आज त्याची संख्या 153 हून अधिक आहे. वाघांची संख्या वाढली असून वाघांसाठी कमी वनक्षेत्र असल्याने ही समस्या अधिकच बिकट झाली आहे, असेही मंत्री ईश्वर खंड्रे यांनी सांगितले.
राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यांमुळे सरासरी 55-60 लोक मृत्युमुखी पडत आहेत. 2021-22 मध्ये 41 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 28 जणांचा हत्तींच्या हल्ल्यामुळे, दोघांचा वाघांच्या हल्ल्यामुळे आणि 11 जणांचा इतर प्राण्यांमुळे मृत्यू झाला. 2022-23 सालामध्ये 57 जणांचा मृत्यू वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे झाला. यात हत्तींच्या हल्ल्यामुळे 32 तर वाघांच्या हल्ल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. 2023-24 मध्ये एकूण 65 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 48 जण हत्तींच्या हल्ल्यामुळे आणि 5 जण वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडले. 2024-25 मध्ये 46 जणांचा मृत्यू झाला असून 36 जण हत्तींच्या हल्ल्यामुळे आणि दोन जण वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडले. यावषी म्हणजेच 2025-26 मध्ये आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 20 जण हत्तींच्या हल्ल्यामुळे तर 4 जणांचा वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची सूचना
हजारो चौरस किलोमीटर जंगलात पूर्णपणे गस्त घालणे शक्मय नाही. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला माहिती देण्यासह वन्यजीवांना जंगलात परत पाठविण्यास एकात्मिक कमांड सेंटर तयार करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात न बसता संघर्षग्रस्त गावांमध्ये जाऊन घटनास्थळीच समस्या सोडवावी. वनाधिकाऱ्यांना त्यांचे फोन बंद न करता लोकांना प्रतिसाद देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. वाघ आणि हत्ती पकडण्याची कारवाई करताना मानक निकषांचे पालन करावे. वाघ आणि हत्ती पकडण्याच्या कारवाईत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाईल, असेही मंत्री खंड्रे म्हणाले.