For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आप’ला विदेशातून अवैध वित्तपुरवठा

06:44 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आप’ला विदेशातून अवैध वित्तपुरवठा
Advertisement

ईडीने गृह मंत्रालयाला सोपविला अहवाल : आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्यात अडकलेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. यापूर्वीच न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणादरम्यान आता ईडीने आम आदमी पक्षाला विदेशातून झालेल्या वित्तपुरवठ्यावरून मोठा खुलासा केला आहे. ‘आप’ला 2014-22 दरम्यान 7.08 कोटी रुपयांची विदेशातून देणगी प्राप्त झाली आहे. तपास यंत्रणेने या पत्रावर आता विदेशातून देणगी प्राप्त करण्याप्रकरणी अनेक आरोप केले आहेत. ही रक्कम प्राप्त करण्यासाठी विदेशी देणगीदारांची ओळख आणि राष्ट्रीयत्वासह अनेक गोष्टी लपविण्याचे आरोप ईडीने स्वत:च्या अहवालात केले आहेत.

Advertisement

आम आदमी पक्षाला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवैत, ओमान आणि अन्य देशांच्या अनेक देणगीदारांकडून निधी प्राप्त झाला आहे. निधी हस्तांतरित करण्यासाठी विविध देणगीदारांकडून एकच पासपोर्ट क्रमांक, क्रेडिट कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.

ईडीने स्वत:च्या तपासात आप आणि त्याच्या नेत्यांकडून विदेशातून देणगी मिळविण्याच्या प्रक्रियेत अनियमितता करण्यात आल्याचे म्हटले आहे. यात पक्षाचे  आमदार दुर्गेश पाठक यांच्यासमवेत अनेक नेत्यांवर 2016 मध्ये कॅनडात निधी जमविण्याच्या कार्यक्रमात जमविलेल्या रकमेचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केल्याचा आरोप आहे. तसेच अनिकेत सक्सेना (आप ओव्हरसीज इंडियाचे समन्वयक), कुमार विश्वास (आप ओव्हरसीज इंडियाचे तत्कालीन संयोजक), कपिल भारद्वाज (आप सदस्य) पाठक समवेत विविध आप कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांदरम्यान पाठविण्यात आलेल्या ईमेलमधील मजकुराद्वारे आरोपांची पुष्टी करण्यात आली आहे.

अमेरिका तसेच कॅनडामध्ये फंड रेजिंग कॅम्पेनद्वारे रक्कम जमविण्यात आली. तसेच एफसीआरए अंतर्गत असलेल्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी ‘आप’ने बुक ऑफ अकौंट्समध्ये खऱ्या देणगीदारांची ओळखही लपविल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. ईडीने स्वत:च्या तपासाशी निगडित सर्व माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला देणगीदारांच्या तपशीलासह पुरविली आहे. यात देणगीदारांचे नाव, त्यांचा देश, पासपोर्ट क्रमांक, देणगीची रक्कम, देणगी देण्याची पद्धत, प्राप्तकर्त्याचा बँक खाते क्रमांक, बिलिंग नाव, बिलिंग पत्ता, बिलिंग दूरध्वनी क्रमांक, बिलिंग ईमेल, देणगीची तारीख इत्यादी तपशील यात सामील आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीशी कनेक्शन

‘आप़कडून विदेशातून देणगी प्राप्त करण्यात झालेले एफसीआरए उल्लंघन तसेच अन्य अनियमितता या पाकिस्तानातून भारतात होत असलेल्या हेरॉइनच्या तस्करीत सामील एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या विरोधात पंजाबच्या फाजिल्का येथे नोंद एका प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आली आहे. यासंबंधी फाजिल्का येथील विशेष न्यायालयाने पंजाबच्या भोलाथ येथील तत्कालीन आप आमदार सुखपाल सिंह खैरा यांना आरोपी म्हणून समन्स बजावला होता. पीएमएलए अंतर्गत ईडीकडून खैरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. यावेळी विदेशी देणगीचा तपशील असलेले आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले होते. यात अमेरिकेतील देणगीदारांची यादी सामील होती.

अमेरिकेकडून मोठी रक्कम प्राप्त

जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे विश्लेषण केले असता आम आदमी पक्षाला 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमेरिकेकडून 1,19,000 डॉलर्सची रक्कम प्राप्त झाल्याचे उघड झाले होते. ‘आप’कडून ही रक्कम अमेरिकेत आयोजित फंड रेजिंग कॅम्पेनदरम्यान जमविण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.