कॅनडामधून भारतीयांची अमेरिकेत अवैध एंट्री
अमेरिका टेन्शनमध्ये
वृत्तसंस्था/ ओटावा
अमेरिकेत कॅनडाच्या मार्गे अवैध प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. खासकरून उत्तर अमेरिकन सीमेवर कॅनडातून प्रवेश करणाऱ्या भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत वेगाने भर पडत आहे. भारतातून आलेले स्थलांतरित कॅनडाच्या सीमेनजीक क्लिंटन काउंटीमध्ये पोहोचत आहेत. तेथून या स्थलांतरितांना दक्षिणेपासून न्यूयॉर्क शहरापर्यंत टॅक्सीद्वारे नेणारे लोक भेटत आहेत. यामुळे या क्षेत्रात एक वेगळेच अर्थकारण उदयास आले असून जे मागील दीड वर्षात उत्तर सीमेवर अनधिकृत क्रॉसिंगमुळे वाढत चालले आहे.
यंदा आतापर्यंत अमेरिकन सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा एजंटांनी उत्तर सीमेवर स्थलांतरितांना रोखण्याचे 20 हजारांहून अधिकवेळा प्रयत्न केले आहेत. हे मागील वर्षापेक्षा 95 टक्क्यांनी अधिक प्रमाण आहे. तर अवैध प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारे 60 टक्के स्थलांतरित हे भारतीय होते. कॅनडाला अपस्टेट न्यूयॉर्कशी जोडणाऱ्या घनदाट जंगलांमधून हे भारतीय अमेरिकेत दाखल होत आहेत. कॅनडाच्या तुलनेत अमेरिकेत उज्ज्वल भविष्यासाठी अधिक संधी उपलब्ध असल्याचे या स्थलांतरितांचे मानणे आहे.
अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडणे सोपे नसते. स्थलांतरितांना हिवाळ्यात अत्याधिक थंडीला सामोरे जावे लागेत. अमेरिका आणि कॅनडादरम्यान झालेल्या एका कराराच्या अंतर्गत त्यांना त्वरित आश्रय देण्यास नकारही दिला जाऊ शकतो. तरीही लोक मध्य अमेरिकेतील धोकादायक हिस्से किंवा मेक्सिकक वाळवंटातून प्रवास करण्यापेक्षा कॅनडातून अमेरिकेत दाखल होणे अधिक सुरक्षित मानतात. अमेरिकेत प्रवेश केल्यावर कुठले ना कुठले काम मिळेल आणि मग आश्रयही मिळविता येईल असे लोकांना वाटत असते.