उपनगरात वाढली अवैद्य व्यवसायांची केंद्रे
कोल्हापूर :
शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे उपनगरांमध्ये वस्ती वाढत आहे. नागरीकरणाच्या नावाखाली उपनगरांमध्ये गुन्हेगारीचे केंद्र सरकले आहे. शस्त्र तस्करी, गांजा विक्रीसह मटका आणि जुगारांचे अड्डे उपनगरामध्ये राजरोसपणे सुरु आहेत. एडका, कोयता, पिस्तुलांच्या जोरावर दहशत करून मिसरूडही न फुटलेले ‘दादा‘ गब्बर बनले आहेत. त्यांनी याच दहशशतीच्या जोरावर आपले काळ्याधंद्यांचे बस्तान बसविले आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे. यामुळे शहराचा विस्तार उपनगरांमध्ये होत आहे. मात्र या विस्तारामुळे उपनगरांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य विस्तारत आहे. उपनगरांचा विकास होत असतानाच येथील जागांचे दरही गगनाला भिडत आहेत. बजेटमधील घरे देण्यासाठी बांधकाम व्यवसायिकही अशा जागांचा शोध घेताना दिसत आहेत. पण यासाठी जागांच्या व्यवहारांमध्ये काही गुन्हेगारीवृत्तीचाही सहभाग होऊ लागल्याने बिल्डरांचीही चिंता वाढली आहे. जमिनींचे वाढते दर पाहून भाऊबंदकीतील वाद चव्हाट्यावर आले. याचा गैरफायदा घेत काही गुंडांनी दहशतीच्या बळावर कमी किमतीत जागा हडपण्याचा ‘डाव‘ साधला आहे.
- जुगार अड्डे
पोलीस प्रशासनाने अवैद्य व्यवसायांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. यामुळे अवैद्य व्यावसायीकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. उपनगरात काही बंद घरे भाड्याने घेवून काही अवैद्य व्यावसायीक आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. सानेगुरुजी, कळंबा आपटेनगर, नानापाटील नगर परिसरात तीन पानी जुगार अड्डे सुरु आहेत. अवैद्य व्यावसायीकांनी एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला असून, यातून संपर्क साधून दररोज तीन पानी जुगार अड्डे सुरु होत आहेत. दररोज लोकेशन बदलत असल्यामुळे पोलिसांनाही कारवाई करणे अशक्य बनले आहे.
- ऑनलाईन मटका
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अवैद्य धंद्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शहरातील सर्व अवैद्यधंदे बंद आहेत. मात्र सध्या उपनगरातून ऑनलाईन मटक्याचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. मटक्याच्या चिठ्या ऑनलाईन पद्धतीने पाठवून मटका जोरात सुरु आहे. मटक्यातील काही व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविण्यासाठी ऑनलाईन मटक्याचा आधार घेतला आहे. व्हॉट्सअॅपद्वारे मटक्याच्या चिठ्या पाठवल्या जात आहेत. या मटक्याने पोलीस यंत्रणेसमोर आवाहन निर्माण केले आहे.
- कमी दरात जागा लुबडण्याचा प्रयत्न
विस्तार होत असल्याने उपनगरांसह आसपासच्या ग्रामीण भागातील मोक्याच्या जागांवर अनेकांचा डोळा आहे. भाऊबंदकीच्या वादातील जमिनी विकून देण्याची ‘सुपारी‘ घेणाऱ्यांकडून दहशतीच्या जोरावर कामे मार्गी लावली जात आहेत. सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव, मुडशिंगी, उजळाईवाडी, वाशी, शिंगणापूर यासह गगनबावडा, राधानगरीतील धरण परिसरातील जागांमध्ये भुरट्यांनी ‘एन्ट्री‘ केली आहे. मोक्याच्या जागा कमी दरामध्ये लुबाडण्याच्या घाट घालण्यात येत आहे. उपनगरातील जागांवर फाळकुट दादा दहशतीच्या बळावर अशा प्रकारे ताबा करत असल्याचे दिसून येत आहे.