For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकायदेशीर कामांवर निर्बंध घालणार

06:42 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकायदेशीर कामांवर निर्बंध घालणार
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेकायदेशीर लेआऊट तसेच इतर बेकायदेशीर कामांवर निर्बंध घालण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. कणबर्गी येथील निवासी योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही शेतकरी न्यायालयात गेल्यामुळे समस्या निर्माण झाली. मात्र आता 25 एकर जमीन सोडून इतर जमिनीमध्ये ही निवासी योजना राबविली जाईल, अशी माहिती पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुडा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisement

सध्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊनच जमिनी घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना 50 टक्के जमिनीचा मोबदला देत आहे. नवीन कायद्यानुसार बुडाने संपूर्ण विकास करून शेतकऱ्यांना त्यामधील 50 टक्के जागा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेच नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले.

रिंगरोडचे जवळपास भू-स्वाधीनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच रिंगरोड पूर्ण होईल. एकूणच शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न सुरू केले आहेत. काहीजण न्यायालयात जात असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी निश्चितच काही दिवसांतच या योजना पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण उपमुख्यमंत्री होणार का? याबाबत पत्रकरांनी प्रश्न उपस्थित केला असता ते हायकमांडच्या निर्णयावरच अवलंबून आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. उत्तर कर्नाटकाला उपमुख्यमंत्री देणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी आमदार राजू सेठ यांनी सांगितले.

गॅरंटी योजनांबाबत बोलताना म्हणाले, कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. सध्या विकासासाठी निधी नसल्याचा गवगवा केला जात आहे. मात्र सरकारकडे निधी उपलब्ध असल्याने काहीच प्रश्न नसल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. शहरातील पाणी समस्येबाबत विचारता, एलअॅण्डटी कंपनीची बैठक घेऊन त्यांना योग्य ती सूचना केली जाईल. शहरातील कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. सांबरा ग्राम पंचायतीचा कर सांबरा विमानतळाकडे मोठ्या प्रमाणात बाकी आहे. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्याची सूचना संबंधित ग्राम पंचायतीला दिली जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 मागील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?

बुडाच्या कार्यक्षेत्रामध्ये बेकायदेशीर कामे झाली आहेत. याबाबत तत्कालीन बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांना दोषी धरण्यात आले होते. त्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे? असे पत्रकारांनी विचारले असता, आयएएस अधिकारी त्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्याबाबत अहवाल आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी कणबर्गी येथील त्या निवासी योजनेमध्ये गैरप्रकार झाला आहे, याकडे लक्ष वेधता, त्याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.