पाईपलाईन रोडवरील धोकादायक सीडीवरील लोखंडी सळ्यांकडे दुर्लक्ष
बेनकनहळ्ळी ग्राम. पंचायतीचा कानाडोळा
बेळगाव : गणेशपूर रोड, पाईपलाईन क्रॉस येथे गटारीवर घालण्यात आलेल्या सीडीच्या लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हा परिसर बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. तरीदेखील धोकादायक सीडीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने वाहनचालक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शौर्य चौक ते गणेशपूरकडे जाणाऱ्या बेळगाव-रामघाट रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. पाईपलाईन रोड येथून सरस्वतीनगर, महालक्ष्मीनगर, एडब्ल्यूडब्ल्यूए कॉर्टर्स, अंगडी कॉलेजकडे जाणाऱ्या वाहनांची सातत्याने वर्दळ असते. तसेच हा एकमेव पर्यायी रस्ता आहे. पण मुख्य रस्त्यापासून पाईपलाईनकडे जाणाऱ्या पेट्रोलपंपजवळील गटारीवरील सीडीच्या लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीला माहिती देऊनदेखील धोकादायक सीडीच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
तुंबलेल्या ड्रेनेजकडेही दुर्लक्ष
त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तरच ग्रामपंचायतीला जाग येणार का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यापासून गटारीतील सांडपाणी तसेच ड्रेनेज तुंबून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरीही याकडे पंचायतीने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.