भाग्यनगर येथे कोसळलेल्या फांद्यांकडे दुर्लक्ष
वाहतुकीला अडथळा, हटविण्याची मागणी
बेळगाव : भाग्यनगर सातवा क्रॉस येथील पडझड झालेल्या झाडांच्या फांद्या हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिकांबरोबरच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. तातडीने पडझड झालेल्या झाडांच्या फांद्या हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मागील आठवडाभर झालेल्या परतीच्या पावसाने झाडे आणि फांद्यांची पडझड झाली आहे. मात्र, अद्याप पडझड झालेल्या फांद्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अशा फांद्या वाहतुकीसाठी अडथळा ठरू लागल्या आहेत. पावसाळ्यात कोसळलेल्या फांद्या आणि झाडांचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. त्यातच कोसळलेली झाडे आणि फांद्या वेळेवर हटविल्या जात नसल्याने धोका निर्माण होऊ लागला आहे. वनखात्याने शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्यांसाठी मोहीम राबविली होती. याअंतर्गत रस्त्यावरील झाडे व फांद्या हटविल्या होत्या. मात्र पावसाने नैसर्गिकरित्या कोसळलेली झाडे आणि फांद्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून कोसळलेल्या फांद्या रस्त्यावरच दिसत आहेत. याचा स्थानिक नागरिक आणि वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे.