For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील स्वच्छतागृहांच्या उपलब्धततेकडे मनपाचे दुर्लक्ष

11:39 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील स्वच्छतागृहांच्या उपलब्धततेकडे मनपाचे दुर्लक्ष
Advertisement

महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर : महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार : मनपा दखल घेणार का?

Advertisement

बेळगाव : शहरातील स्वच्छतागृहांच्या उपयुक्ततेकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा निरुपयोगी ठरत आहेत. ई-टॉयलेटची सोय बिनकामी ठरली आहे. नुकताच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांच्या उपस्थितीत शहरातील महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यामुळे स्वच्छतागृहांची सोय मनपा करणार का? असा प्रश्न शहरवासियांतून उपस्थित केला जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेट देऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शहरातील महिला वस्तीगृहांसह शासकीय शाळा-महाविद्यालयांच्या महिला वस्तीगृहांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची सूचना महिला आणि बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. तर शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक विकासकामे राबविण्यात आली आहेत. बस स्थानकांचा विकास करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. मात्र ती वापरात नसल्यामुळे स्वच्छतागृहे निरुपयोगी ठरल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. विशेष करून शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याचा मुद्दा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीही ही बाब महानगरपालिकेच्या व्याप्तीत येते असे सांगितले. त्यामुळे मनपा महिला स्वच्छतागृहांसह शहरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-टॉयलेटची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement

ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय 

धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यांशेजारी उभारण्यात आलेली ई-टॉयलेट सुविधा निरुपयोगी ठरली आहे. त्याठिकाणी कचरा टाकला जात असून बसथांब्यांमध्ये प्रवाशांना उभारण्यासाठीही गैरसोयीचे ठरत आहे. मनपाकडून स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर ई टॉयलेट सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयही होत आहे.

Advertisement
Tags :

.