For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इफ्फीमुळे जागतिक चित्रपटसृष्टीत भारताचे स्थान बळकट

08:02 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
इफ्फीमुळे जागतिक चित्रपटसृष्टीत  भारताचे स्थान बळकट
Advertisement

केंद्रीय मंत्री एल. मुऊगन यांचे प्रतिपादन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या यंदाच्या इफ्फीमध्ये 127 देशांमधून अभूतपूर्व असे 3,400 चित्रपट सादर झाले आहेत. त्यामुळे आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले आहे. 84 देशांमधील 270 पेक्षा जादा चित्रपट प्रदर्शित होणार असून 26 जागतिक प्रीमियर, 48 आशिया प्रीमियर आणि भारतातील 99 प्रीमियर यांचा त्यात समावेश आहे. हा वाढता सहभाग केवळ महोत्सवाची प्रतिष्ठाच नाही तर जागतिक चित्रपटसृष्टीत भारताचे वाढते स्थान देखील बळकट करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एल. मुऊगन यांनी केले.

Advertisement

शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अजय नागाभूषण, स्मिता वत्स शर्मा आणि प्रकाश मगदूम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. मुऊगन यांनी, दि. 20 ते 28 दरम्यान होणाऱ्या इफ्फीची वाढती जागतिक प्रतिष्ठा, परिवर्तनकारी उपक्रम आणि भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देणे तसेच आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यातील महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करण्याच्या उद्देशाने यंदा अनेक नवीन उपक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना मानवंदना

इफ्फीचा यंदाचा ‘कंट्री फोकस’ जपानवर आहे, त्यात स्पेन आणि ऑस्ट्रेलियाचे विशेष पॅकेजेस आहेत. या महोत्सवात गुऊ दत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यासारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना मानवंदनादेखील देण्यात येणार असल्याचे मुऊगन यांनी सांगितले.

चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेता रजनीकांत यांना समारोप सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांचा ‘लाला सलाम’,हा चित्रपटही दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांनाही महोत्सवात सन्मानित करण्यात येईल, असे मुऊगन यांनी सांगितले.

‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रमाबद्दल बोलताना त्यांनी, यंदा अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे 799 प्रवेशिकांमधून 124 तऊण निर्मात्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. वेव्हज फिल्म बाजाराच्या 19 व्या आवृत्तीत भारत आणि विदेशातील शेकडो प्रकल्पांसाठी सह-निर्मिती आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

नारीशक्तीला सलाम

सर्वात महत्वाचे म्हणजे यंदाच्या महोत्सवात नारीशक्तीला सलाम करण्याच्या उद्देशाने महिला दिग्दर्शकांचे 50 पेक्षा जास्त चित्रपट सादर केले जातील. या महोत्सवात 21 ऑस्कर प्रवेशिका आणि 50 पेक्षा जास्त नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येतील. जगातील चित्रपट महोत्सवांमधील अव्वल पुरस्कार विजेते निवडक चित्रपटही दाखविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

शिमगा, कार्निव्हल मिरवणुकीने उद्घाटन : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना, यंदा इफ्फीचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन होणार असल्याचे सांगितले. त्यानिमित्त दि. 20 रोजी दुपारी 3.30 वाजता गोवा मनोरंजन संस्थेकडून कला अकादमीपर्यंत शिमगा व कार्निव्हलची भव्य चित्ररथ मिरवणूक होणार आहे. त्यानंतर ‘द ब्ल्यू ट्रेल’ या चित्रपटाने इफ्फीचा शुभारंभ होईल. समारोप सोहळा मात्र नेहमीप्रमाणे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महोत्सवातील चित्रपट आयनॉक्स पणजी, आयनॉक्स पर्वरी, मॅक्विनेझ पॅलेस-पणजी, रवींद्र भवन-मडगाव, मॅजिक मूव्हीज-फोंडा, सम्राट आणि अशोक थिएटर पणजी येथे दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय मिरामार किनारा, रवींद्र भवन मडगाव, वागातोर किनारा आदी ठिकाणी ‘ओपन एअर’ क्रीनिंगचे आयोजन केले जाईल. या महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींच्या सोयीसाठी मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असून तब्बल 7500 प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.