इफ्फीत 50 महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा समावेश
केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन यांची माहिती; नारी शक्तीला प्रोत्साहन देणार; ब्राझीलच्या ‘द ब्ल्यू ट्रेल’ने होणार प्रारंभ
पणजी : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) वेध सुरु झाले असून सिनेमातील विविध कलागुण, बुद्धिमत्ता, महिला निर्मात्यांना त्यातून व्यासपीठ मिळेल अशी आशा केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी वर्तवली आहे. सदर महोत्सवात 50 महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. नारी शक्तीला चित्रपटातून प्रोत्साहन देणे हा त्यामागील हेतू असल्याचे ते म्हणाले.या महोत्सवाची माहिती देणारी विशेष पत्रकार परिषद दिल्लीत झाली. त्यावेळी माहिती देताना डॉ. मुरुगन बोलत होते. ‘द ब्ल्यू ट्रेल’ या ब्राझीलच्या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होणार असून 75 वर्षीय वृद्ध महिलेची कहाणी त्यात गुंफण्यात आली आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्या सिनेमाने ‘सिल्वर बियर’ हा किताब जिंकल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली.
बहुभाषिक चित्रपटांसाठी ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ प्रमाणपत्र
जगातील 81 देशातील 240 पेक्षा अधिक चित्रपट या महोत्सवात समाविष्ट असून 13 वर्ल्ड प्रीमियर, 4 इंटरनॅशनल प्रीमियर तर 46 एशियन प्रीमियर चित्रपट महोत्सवात होणार आहेत. सुमारे 127 देशांमधून 2314 प्रवेशिका या महोत्सवासाठी आल्या असून त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात जगभर झाल्याची ती पावतीच असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येणार असून बहुभाषिक चित्रपटांसाठी ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ हे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे मुरुगन म्हणाले.
स्पेशल पॅकेज
जपान, स्पेन, ऑस्टेलिया हे महोत्सवातील प्रमुख भागीदार देश असून त्यांच्या सिनेमांना ‘स्पेशल पॅकेज’ मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय विभागात 160 चित्रपट
महोत्सवातील आंतरराष्ट्रीय विभागात 160 चित्रपटांचा समावेश असून पुरस्कारप्राप्त 80 चित्रपट महोत्सवातून दाखवले जाणार आहेत. ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ विभागात 55 चित्रपटांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात 25 फिचर आणि 20 नॉनफिचर चित्रपटांचा समावेश आहे.
फिल्म बाजारामुळे महोत्सवाचे महत्त्व वाढले : शेखर कपूर
महोत्सवाचे संचालक शेखर कपूर म्हणाले की, भारत हा सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा तसेच पाहणारा देश आहे. त्यातून नवीन कलाकार उदयास येतात आणि ते जनतेचे सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन करतात. फिल्म बाजारमुळे सदर महोत्सवाचे महत्त्व अजून वाढले असून त्याचा फायदा गोव्यासह देशाला होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
रजनीकांत यांचा होणार सन्मान
सिनेमा क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने रजनीकांत या अभिनेत्याचा महोत्सवाच्या समारोप सोहळ्dयात विशेष सन्मान होणार आहे.