इफ्फीचा आज समारोप
पणजी : गेले 9 दिवस पणजी येथे चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. समारोप सोहळा होणार असून तो बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. गेल्या 20 नोव्हेंबर रोजी महोत्सवाचा आयनॉक्स, पणजी येथे भव्य अशा चित्ररथ मिरवणुकीने शुभारंभ झाला होता. त्यानंतर गेले आठ दिवस विविध देशांतील विविध भाषिक चित्रपटांचे प्रदर्शन आयनॉक्समधील थिएटरमध्ये करण्यात आले. त्यांचे विविध कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर मान्यवर मंडळीनी महोत्सवात हजेरी लावली. अनेकांनी रेड कार्पेटवरुन चालण्याचा आनंद घेतला.
विविध राज्यातील चित्रपटांचे रसिक महोत्सवासाठी आले होते. देशी-विदेशी प्रतिनिधी तसेच पत्रकार यांनीही महोत्सवात हजेरी लावली. शिवाय 20 ते 24 नोव्हेंबर असे एकूण 5 दिवस मेरिएट रिसोर्ट-कांपाल येथे व्हेवज फिल्म बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. आता महोत्सवाच्या समारोपाची तयारी झाली असून केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री आश्विन वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे त्यावेळी उपस्थित राहाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही हजेरी लाभणार असून निमंत्रण पत्रिका असणाऱ्या व्यक्तींनाच तेथे प्रवेश देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.