काळादिन पाळायचा असेल तर महाराष्ट्रात पाळा!
खासदार जगदीश शेट्टरांचा अनाहूत सल्ला : सीमावासियांमधून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी मतांवर निवडून आलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी पुन्हा एकदा लोकशाहीमार्गाने काळादिन पाळणाऱ्या मराठी भाषिकांना लक्ष्य केले आहे. कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जात असताना कोणीही काळादिन पाळू नये. केवळ कर्नाटकच नाहीतर महाराष्ट्रातील लोकदेखील आपुलकीने राज्योत्सव दिन साजरा करतात. त्यामुळे काळादिन पाळायचाच असेल तर महाराष्ट्रात जाऊन पाळा, असा मानभावी सल्ला त्यांनी दिला. परंतु, यामुळे मराठी भाषिकांतून खासदारांवर जोरदार टीका केली जात आहे. शनिवारी आयोजित पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना आपण केलेल्या कामांपेक्षा म. ए. समितीवर बोलणे पसंत केले. सीमाप्रश्न केव्हाचा संपला असून महाजन अहवाल हा कर्नाटकासाठी अंतिम आहे. एकीकडे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना मग काळादिन पाळायची गरजच काय? असा उलट प्रश्न खासदारांनी केला. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे.
सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम- एच. के. पाटील
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्नाटकचे कायदा व संसदीयमंत्री एच. के. पाटील शनिवारी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे सीमाप्रश्नावर तोंडसुख घेतले. सीमाप्रश्न हा संपुष्टात आला आहे. महाजन अहवाल आला तरी वादाची गरज काय होती? कर्नाटकासाठी महाजन अहव ालच अंतिम आहे. त्यामुळे राज्योत्सव साजरा केला जात असताना कोणीही वाद निर्माण करू नये, असा अनाहूत सल्ला त्यांनीही सीमावासियांना दिल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.