या जीवाला स्पर्श केल्यास प्राणाला मुकाल
पृथ्वीवर अनेक सुंदर जीव असून त्यांना स्पर्श करावा असे वाटत असते. परंतु एखाद्या जीवाविषयी माहिती नसेल तर त्याला स्पर्श करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा. जमिनीवर आणि समुद्रात असे अनेक जीव आहेत, जे दिसण्यास अत्यंत सुंदर आहेत, परंतु त्यांना स्पर्श केला तर तुमचा मृत्यू निश्चित आहे.
बॉक्स जेलीफिश या सागरी जीवाला सर्वात विषारी जीव मानले जाते. या जेलीफिशचे नाव त्याच्या बॉक्ससारख्या आकारामुळे पडले आहे. विशेषकरून ऑस्ट्रेलियाच्या आसपासच्या सागरी भागात आढळणाऱ्या या जेलीफिशपासून लोक दूरच राहतात. समुद्रात या जेलीफिशपासून किमान 15 फूट अंतर राखणे आवश्यक आहे. या जेलिफिशमध्ये लांब टेंटेकल्स असतात जे 10 फूटापर्यंत लांब असू शकतात.
या जीवाचे पारदर्शक शरीर लोकांना दूरूनच आकर्षित करत असते. परंतु याचे सौंदर्य पाहून त्याला स्पर्श केल्यास त्याचा दंश संबंधिताला मृत्यूच्या दाढेत पोहोचवू शकतो. बॉक्स जेलीफिशच्या विषात अनेक प्रकारचे टॉक्सिन असतात, जे हृदय आणि त्वचेवर थेटपणे प्रभाव पाडते. याचे विष इतके घात असते की ते माणसाला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवू शकते. मृत्यू न झाल्यास शरीराला लकवा होऊ शकतो. या जेलिफिशचा दंश झाल्यास संबंधिताला त्वरित तीव्र वेदना जाणवू लागतात, यानंतर शरीराच्या प्रभावित हिस्स्यात जळजळ आणि सुन्नपणा जाणवू लागतो. मग विष फैलावू लागत श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो आणि योग्यवेळी उपचार न मिळाल्यास संबंधिताचा मृत्यू ओढवू शकतो.
बॉक्स जेलीफिशपासून माणूस दूरच राहू इच्छितो. परंतु अनेकदा याचे सौंदर्य पाहून लोक त्याच्या नजीक जातात आणि त्याच्या दंशाचे शिकार ठरतात. विशेषकरून ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि फिलिपाईन्स यासारख्या देशांमध्ये हे प्रकार घडत असतात.