पालकमंत्री साहेब, शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष कराल तर कोल्हापूरचा वनवा सांगलीत
मालगाव येथे कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर माजी खासदार राजू शेट्टींकडून पालकमंत्री सुरेश खाडे यांना थेट इशारा
मिरज प्रतिनिधी
भाजपा हा केवळ आश्वासनांचा पक्ष दिसत आहे. पालकमंत्री महोदय ऊस दराच्या आंदोलनाकडे लक्ष द्या, निर्णय घ्या, ऊस दराची कोंडी फोडा, अन्यथा कोल्हापूरचा वनवा सांगली जिल्ह्यात पेटल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना दिला.
तालुक्यातील मालगाव येथे पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे आणि माजी खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर होते. पालकमंत्री खाडे म्हणाले, ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये जो तोडगा निघाला तोच तोडगा सांगलीसह महाराष्ट्र मध्ये दोनच दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून नक्कीच काढू. आंदोलनाचे वादळ शेतकरी व शेतकरी संघटनेला परवडणार नाही कुठेतरी मध्य, तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्री यांनी मांडली.
त्यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दराचा प्रश्न सोडवण्यास भाजपा वेळ काढू भूमिका घेत आहे. ज्या दुष्काळी पट्ट्यातील द्राक्ष बागायतदारानी पिकवलेला बेदाणा शालेय पोषण आहारात घेतो म्हणून शासनाने सांगितले, पण त्याचा अद्याप जीआर काढला नाही. ऊसदर जाहीर करतो म्हटले तोही जाहीर केला नाही. म्हणून पालकमंत्री महोदय भाजप हा पक्ष फक्त आश्वासनाचा पक्ष आहे का? असा सवालही शेट्टी यांनी विचारला. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील ऊस दर कोंडीही लवकर फोडा. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा पालकमंत्री साहेब कोल्हापुरातला वनवा सांगलीत पेटल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.