For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिम्मत असेल तर महाजन आयोग सर्वोच्च न्यायालयात मांडा

12:54 PM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिम्मत असेल तर महाजन आयोग सर्वोच्च न्यायालयात मांडा
Advertisement

प्रकाश मरगाळे यांचे कर्नाटक सरकारला आव्हान, महामेळाव्याच्या ठिकाणी सीमावासियांचा मराठीबाणा

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्यासाठी प्रशासनाकडे रितसर अर्ज करण्यात आला होता. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तोंडी परवानगी देण्यात आली. परंतु, सोमवारी सकाळपासून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. मराठी भाषिकांवर दडपशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारने हिंमत असेल तर महाजन आयोग हा कर्नाटकासाठी अंतिम आहे, असे सर्वोच्च न्यायालय तसेच संसदेत मांडावे, असे जाहीर आव्हान मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिले.

व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्यासाठी दाखल झालेल्या प्रकाश मरगाळे यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारला खुले आव्हान दिले. यावेळी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठीबाणा दाखवत मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. शहरासह तालुका म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठिकठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. पोलीस प्रशासनाने महामेळावा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, म. ए. समितीने जशास तसे उत्तर दिले.

Advertisement

तालुका म. ए. समितीची जोरदार घोषणाबाजी

तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मार्गाने व्हॅक्सिन डेपो मैदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करत ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

करवेच्या नेत्यांची चमकोगिरी

रितसर परवानगी अर्ज देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचे निश्चित केले होते. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच करवेचा एक नेता व दोन कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो परिसरात दाखल होऊन चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वाहनातून इतरत्र रवानगी केली. पोलिसांची नजर चुकवून करवेचे कार्यकर्ते इथपर्यंत पोहोचलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. तर करवेच्या काही कार्यकर्त्यांना संचयनी सर्कल येथे रोखण्यात आले. केवळ माध्यमांमध्ये बातम्या व्हाव्यात, यासाठीचा हा खटाटोप असल्याचे शेवटी दिसून आले.

पोलिसांची अशीही चूक

मेळाव्यासाठी आलेल्या मराठी भाषिकांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या बसमध्ये बसविण्यात येत होते. काही कार्यकर्ते झाले की ती बस एपीएमसी पोलीस स्थानकात नेली जात होती. याचवेळी करवेचा म्होरक्या व त्याचे दोन कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. नवख्या पोलिसांनी करवेच्या कार्यकर्त्यांना अनावधानाने म. ए. समिती कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्येच कोंबले. परंतु एका अधिकाऱ्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने तातडीने त्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या वाहनातून उद्यमबागला नेण्यास सांगितले. अन्यथा म. ए. समिती व करवेच्या कार्यकर्त्यांचा एकाच बसमधून प्रवास झाला असता.

म. ए. समितीच्या सरचिटणीसांचा गनिमीकावा

व्हॅक्सिन डेपो मैदानापर्यंत कोणीही कार्यकर्ते पोहोचू नयेत, यासाठी चारही बाजूने बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा बंदोबस्त भेदून मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर मैदानापर्यंत पोहोचले. सर्व पोलीस नवखे असल्यामुळे त्यांनाही अष्टेकर यांचा अंदाज आला नाही. त्याचवेळी टिळकवाडी पोलीस स्थानकातील एका हवालदारने त्यांना ओळखले. त्यामुळे तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. म. ए. समितीचा एकच पदाधिकारी व्हॅक्सिन डेपोच्या मैदानापर्यंत पोहोचू शकला. त्यामुळे मालोजी अष्टेकर यांच्या गनिमीकाव्याचे मराठी भाषिकांतून कौतुक झाले.

Advertisement
Tags :

.