For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य आहे तर सारे कांही...

06:57 AM Jan 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य आहे तर सारे कांही
Advertisement

टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झाचा संदेश : तरुण भारतला दिली खास मुलाखत

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमान्य मॅरेथॉन 2025’ स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झा यांच्या घेतलेल्या खास मुलाखतीत आरोग्याबाबत प्रश्न विचारला असता ‘आरोग्य आहे तर सारे काही आहे...,’ असा  संदेश त्यांनी सर्वांना दिला. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने बेळगावकरांसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्याचा फायदा अनेक तरुणांना होत राहील. याचा प्रत्यय आम्हाला पहाटेपासून बेळगावसह इतर जिल्ह्यांतून व राज्यांतून येथे आलेल्या मॅरेथॉनपटूंनी दाखवून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

  प्रश्न : लोकमान्य मॅरेथॉनबद्दल काय सांगाल?

-सर्वप्रथम मी लोकमान्यची आभारी आहे. मी प्रथमच बेळगावमध्ये आले आहे. लोकमान्य मॅरेथॉनच्या माध्यमातून बेळगावला येण्याची संधी मिळाली. विशेषकरून मॅरेथॉनच्या माध्यमातून प्रत्येकाचे शरीर सुदृढ राहावे याबाबत जागृती केली जाते. त्यामुळेच बेळगावला आल्यानंतर भल्या पहाटे येथील लोकांचा प्रतिसाद पाहून आपल्याला आनंद झाला.

 प्रश्न : आपल्या जीवनात आरोग्य आणि खेळ अशा प्रकारे बदल घडवू शकतो?

-विशेषकरून तंदुरुस्ती, खेळ, आरोग्यामुळे देशात बदल घडवू शकतो. सध्या तरी आम्हीही त्याच रस्त्यावर आहोत. 20 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पण सध्या अशा

मॅरेथॉनद्वारे परिस्थिती बदलत आहे. आपण आरोग्याविषयी जागृती करतो. तसेच आपण ज्याप्रमाणे शिक्षणाविषयी सांगतो, त्याचप्रमाणे आरोग्याविषयीही जागृती करणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्याबाबतही आपल्याला अनुभवांबरोबरच कलागुणांना वाव मिळतो.

  प्रश्न : महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी काय कराल?

-पूर्वीच्या काळी महिलांना क्रीडा क्षेत्रात प्राधान्य मिळत नव्हते. पण सध्या ती परिस्थिती राहिलेली नाही. आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्षात महिला आघाडीवर आहेत. आजच्या तरुणी ध्येय समोर ठेवून कार्यरत राहिल्यास यश निश्चित गाठू शकतात. चूल आणि मूल यांच्यात न अडकता ध्येयाने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रश्न : तुमच्यासारखेच टेनिसपटू होण्याची इच्छा बाळगतात, तुम्ही तर आयकॉन आहात, त्याबद्दल काय सांगाल?

-प्रयत्नांची पराकाष्ठा करा, अपयशाने खचून जाऊ नका. दिग्विजयासाठी पराभव पचविण्याची क्षमता वाढवा. प्रामाणिक कष्ट केल्यास विजय निश्चितच मिळतो. विजयाची सुरुवातच पराभवाने होते. विजयी होण्याआधीच आपण पराभवाच्या विळख्यात गुरफटून दुर्लक्ष करतो. जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत आपण मागे न हटता प्रयत्न करावेत.

 प्रश्न : बेळगावच्या हवामानाबद्दल काय सांगाल?

-येथील हवामान चांगले आहे. येथे आल्यावर आपल्याला हैद्राबादची आठवण झाली.

प्रश्न : लोकमान्य मॅरेथॉनच्या आयोजनाबद्दल काय सांगाल?

लोकमान्यने जांबोटीसारख्या ग्रामीण भागातील 32 गावांना दत्तक घेऊन अशिक्षित मुलांना शिक्षित करण्याचे ध्येय बाळगले आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यांनी असेच कार्य पुढील काळातही करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.