पुरावे असतील तर, पोलिसांकडे द्यावे
पूजा नाईकला मुख्यमंत्र्यांचे आवाहन : कारवाई होईलच : नव्याने एफआयआर नोंदवण्याचे निर्देश
पेडणे : पूजा नाईक हिने नोकरभरतीप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी आरोप करण्यापूर्वी थेट पोलिस यंत्रणेकडे जाऊन त्यांची नावे द्यावीत. जे कोणी या प्रकरणात सामील असतील ते मग मंत्री, अधिकारीही असेना, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी पूजाने पुरावे द्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेले आहे. नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी पत्रकारांनी पेडणे येथे एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शुक्रवारी पूजा नाईक हिने नोकरी देण्याच्या बदल्यात सरकारमधील एक मंत्री, एक आयएएस अधिकारी यांनी आपल्याकडून 600 नोकऱ्यांसाठी 16 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. तिच्या या गौप्यस्फोटामुळे ‘कॅश फॉर जॉब’ हे थंडावलेले प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. पूजा नाईक हिच्या शुक्रवारच्या नव्या आरोपांमुळे नोकरी घोटाळ्याला नवे वळण मिळाले आहे.
तथ्य असल्यास कारवाई होईल
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आरोप गंभीर आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्या नावांसह माहिती पोलिस अधिकाऱ्यांना द्यावी. मुख्यमंत्री कार्यालयात धाव घेण्याची आवश्यकता नाही. तथ्य असेल तर कडक कारवाई करण्यात येईल. पुराव्यांवर आधारित सत्य असेल, तर कोणतीही व्यक्ती मोठी नाही. मंत्री असोत किंवा वरिष्ठ अधिकारी असोत, तपासात पुरावे मिळाले तर कायदेशीर कारवाई टाळली जाणार नाही. आपण पोलिसांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तथ्य आढळल्यास तत्काळ एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पूजाने नावे जाहीर करुन पुरावे द्यावेत : तानावडे
गोव्यात घडलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळाप्रकरणी सरकारने यापूर्वीच कडक धोरण अवलंबले आहे. याप्रकरणी पूजा नाईक यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पोलिसस्थानकात तक्रार नोंदवावी. पोलिस तसेच सरकारकडूनही योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कासरपाल डिचोली येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या खासदार सदानंद शेट तानावडे यांना पत्रकारांनी पूजा नाईक यांच्या वक्तव्याबाबत छेडले होते.