उष्माघात त्रास झाल्यास, तत्काळ उपचार घ्या
कोल्हापूर :
मार्च महिन्याच्या मध्यावधीतच कोल्हापूर शहरासह जिह्यातील तापमानाचा पारा 38 अंशांवर गेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भर दुपारी शेतातील व कष्टाची कामे टाळावीत. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ उपचार घ्यावेत. नागरिकांनी उष्माघात होऊ नये यासाठी आतापासूनच सजग रहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) होण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात शरीर गार ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यासाठी दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे.
गारसर पाणी किंवा माठातील पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, फळांचे रस यांचा समावेश आहारात करावा. शीतपेय आणि जास्त साखर असलेले कोल्ड्रिंक्स टाळावेत, कारण त्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण आणखी कमी होते असे डॉ. पिंपळे यांनी नमूद केले.
- हलका आणि पोषणयुक्त आहार घ्या
उन्हाळ्यात पचनसंस्था थोडी मंदावते, त्यामुळे हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा. हिरव्या भाज्या, फळे, कोशिंबिरी आणि दूध यांचा समावेश असावा. कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी यांसारखी रसदार फळे खावीत. मसालेदार, तळलेले आणि जड अन्न शक्यतो टाळावे, कारण ते पचायला वेळ लागतो आणि उष्णता वाढते. उन्हाळ्यात आंबट पदार्थ आणि जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
- योग्य कपडे परिधान करा
उन्हाळ्यात शरीराला पुरेशी हवा मिळावी यासाठी हलक्या रंगांचे, सैलसर आणि सूती कपडे घालावेत.काळ्या आणि गडद रंगाचे कपडे उन्हाचा अधिक उष्ण परिणाम करतात, त्यामुळे हलक्या रंगांचे कपडे वापरावेत.टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा, विशेषत? जर उन्हात फिरण्याची गरज असेल.शरीर झाकले जाईल असे कपडे वापरल्यास त्वचेचे संरक्षण होते आणि घामोळ्या होण्याचा धोका कमी होतो.
- ऊन टाळा आणि सावलीत राहा
सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळावे, कारण या वेळेत सूर्यप्रकाश सर्वाधिक तीव्र असतो.जर बाहेर जाणे अत्यावश्यक असेल, तर सनक्रीन लोशन लावावे, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरावे आणि शक्यतो छत्री सोबत ठेवावी.
- शरीर थंड ठेवण्यासाठी उपाय
उन्हाळ्यात दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने राहते. पंखा, कुलर किंवा एसीचा योग्य वापर करावा, पण गरम झालेल्या अवस्थेत लगेच थंड हवेत जाऊ नये. घाम आल्यावर ताबडतोब थंड पाणी पिऊ नये, कारण त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. उष्माघाताची लक्षणे ओळखा आणि त्वरित उपाय करा
- उष्माघाताची लक्षणे
सतत डोके दुखणे, गरगरणे किंवा चक्कर येणे, जास्त घाम येणे किंवा काही वेळाने घाम येणे बंद होणे.
उलटी, मळमळ, ताप किंवा अशक्तपणा उपाय
त्वरित सावलीत जावे आणि शरीर थंड करण्यासाठी ओल्या कापडाने अंग पुसावे. भरपूर पाणी प्यावे, इलेक्ट्रोलाइट्स किंवा ओआरएस घ्यावे. जर त्रास अधिक होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी आवश्यक
उन्हाळ्यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्यांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते. मुलांना वेळोवेळी पाणी आणि रसदार फळे द्यावीत. वृद्ध लोकांनी उन्हात फिरणे टाळावे आणि गरजेपेक्षा जास्त मेहनत करू नये. मुलांना उन्हात खेळू देताना टोपी किंवा कॅप घालावी आणि पुरेशी सावलीत खेळण्याची व्यवस्था करावी.
- त्वचेची आणि केसांची काळजी घ्या
उन्हामुळे त्वचा कोरडी पडते आणि सनबर्न होण्याचा धोका असतो. त्यामुळे बाहेर जाताना सनक्रीन वापरणे आवश्यक आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करावा.केसांना उन्हामुळे अधिक नुकसान होऊ नये म्हणून स्कार्फ किंवा टोपी घालावी आणि आठवड्यातून दोनदा तेल लावावे.