सरकार चालवता येत नाही तर चालते व्हा
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची काँग्रेसवर टीका
प्रतिनिधी/ बेळगाव
काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला लोक कंटाळले आहेत. सरकार चालवता येत नसेल तर निवडणुकीसाठी तयार व्हा. व्यवस्थित सत्ता चालवा नाहीतर चालते व्हा, असा इशारा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला आहे. शनिवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर टीका केली आहे.
नेतृत्व बदल करायचे असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीसाठी तयार व्हा, असे काँग्रेस नेते माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी सांगितले आहे. तुमच्यातील भांडण रस्त्यावर आले आहे. विकासकामे खुंटली आहेत. रस्त्यांची वाताहत झाली आहे. सरकारी इस्पितळात औषधे मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कर्नाटकात सरकार आहे का? असा प्रश्न पडतो आहे. अंतर्गत कलहाचे परिणाम प्रशासनावर होत आहेत, असेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन अल्पोपाहार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खरेतर आपण मुख्यमंत्री पदावर राहणार असे सिद्धरामय्या यांनी जाहीर करायला हवे होते. तसे झाले नाही. हायकमांड जे सांगेल ते आम्हा दोघांना मान्य आहे, असे या नेत्यांनी जाहीर केले आहे. याचाच अर्थ काँग्रेसमध्ये अंतर्गत लाथाळ्या आहेत असा होतो. या नेत्यांनी सत्तासंघर्ष मान्य केला आहे.
अंतर्गत कलहामुळे प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी गायब झाले होते. कुठे गेले होते, कुणालाच माहीत नाही. पक्षावर त्यांचे नियंत्रण उरले नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही पक्षांतर्गत घडामोडींमुळे हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघे हायकमांडचे ऐकतीलच असे नाही. मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या कायम राहणार की आणखी कोणाची निवड होणार याची स्वत: राहुल गांधी यांनाच माहिती नाही, असे सांगतानाच आपण सत्ता स्थापण करण्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करणार नाही, असे प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.