अधिकारी-पोलीसच गळाला, खात्याची इभ्रत पणाला!
महासंचालकांची ‘खा की’ला पुन्हा एकदा समज : गुन्ह्यात सहभागी असल्यास कठोर कारवाईचा इशारा, पोलीस दलाची अब्रू वाचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या, वाटमारी, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. निपाणीत तर दरोडेखोरांनी एका पोलिसाला पिटाळल्याचे फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सोमवार दि. 8 डिसेंबरपासून बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा अधिवेशन बंदोबस्तात गुंतली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगारांची धास्ती वाटू लागली आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याच खात्यातील गुन्हेगारांचे काय करावे? याची काळजी लागली आहे. राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा पत्र पाठविले आहे. पोलीस दलातील गुन्हेगारीबद्दल त्यांनी या पत्रात काळजी व्यक्त केली आहे.
21 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना चार पानी पत्र पाठवून पोलीस दलाची बेअब्रू टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये? यासाठी तब्बल अठरा मार्गसूची ठरवून दिल्या होत्या. पोलीस स्थानकात तक्रारी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांशी आदबीने वागावे, व्यवहारात पारदर्शकता असावी, नागरिकांच्या तक्रारी संयमाने ऐकून घ्याव्यात, नागरिकांशी संभाषण करताना सौम्य भाषेत बोलावे, उर्मटपणा करू नये, कोणत्याही परिस्थितीत व्यक्ती किंवा संस्थांकडून लाच स्वीकारू नये, नैतिकतेचे पालन करावे, एकंदर जबाबदारीने काम करावे, अशा सूचना दिल्या होत्या.
याबरोबरच केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यातील एका मोठ्या समस्येवरही राज्य पोलीस महासंचालकांनी बोट ठेवले होते. पोलीस स्थानकात एखादी तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना हद्दीच्या आधारावरून पिटाळण्याचे प्रकार वाढले आहेत. ही घटना आपल्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे सांगून संबंधितांना पिटाळले जाते. त्याला रोक लावण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांनी कडक सूचना केल्या आहेत. घटना कोणत्याही पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडो, तक्रार घेऊन येणाऱ्यांना बोलावून प्रथम एफआयआर दाखल करून घ्या, त्यानंतर ही घटना तुमच्या हद्दीत येत नसेल, ज्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे, त्या पोलीस स्थानकाला पुढील तपासासाठी प्रकरण वर्ग करण्याची सूचना केली होती. बेळगाव जिल्ह्यात या सूचनांचे पालन केले जात नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. आता 5 डिसेंबर 2025 रोजी डॉ. एम. ए. सलीम यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीन पानी पत्र पाठविले आहे.
राजधानी बेंगळूर, दावणगेरीसह विविध ठिकाणी पोलीस दलावरील विश्वासाला धक्का पोहोचेल, अशा घटना घडल्या आहेत. चोऱ्या, दरोडे व फसवणूक प्रकरणात काही अधिकारी, पोलिसांचा सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणात त्यांना अटकही झाली आहे. अशा घटनांमुळे पोलीस दलावरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे. संपूर्ण पोलीस व्यवस्थेकडेच संशयाने पाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा उल्लेख करीत अशा घटना रोखण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांनी सक्त ताकीद दिली आहे. चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच अपहरण, वाटमारी प्रकरणातही पोलिसांचा सहभाग आढळून आला आहे. अशा गुन्हेगारी प्रकरणात अधिकारी व पोलिसांचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. अशा घटनांमुळे सर्वसामान्यांचा पोलीस दलावरील विश्वास उडून जातो. गुन्हेगारी प्रकरणात सहभाग असणाऱ्या अधिकारी व पोलिसांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य पोलीस महासंचालकांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन नियमितपणे करावे, कायदेशीर कर्तव्ये, नैतिकतेचे मापदंड पाळण्यासाठी व भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती करण्यासाठी सतत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, जर एखादा अधिकारी वा पोलीस कर्मचारी गैरप्रकारात अडकल्याचे आढळून आल्यास त्वरित राज्य पोलीस मुख्यालयाला माहिती द्यावी. पोलीस दलाची अब्रू वाचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. अधिकारी व पोलिसांचे मनोबल खचणार नाही, याकडेही लक्ष द्यावे. अधिकारी व पोलिसांचे गैरवर्तन थोपविण्यासाठी अपयशी ठरणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा राज्य पोलीस महासंचालकांनी दिला आहे.
प्रत्येकाने काळजी घेण्याची सूचना
पोलीस दलाची इभ्रत व पोलीस दलावरील आदर याला धक्का बसत असेल असे प्रकार खपवून घेणे अशक्य आहे. पोलीस दलाची बेअब्रू होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची सूचना राज्य पोलीस महासंचालकांनी केली आहे. यापूर्वी बेळगाव व जिल्ह्यातही पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. आजही घडत आहेत. त्या रोखण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांच्या मनात जी तळमळ आहे, ती स्थानिक अधिकाऱ्यांच्या अंगात बाणणे आवश्यक आहे. बेळगावात घडलेल्या अनेक गैरप्रकारांवर अधिकाऱ्यांनी पांघरुण घातले आहे.