कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्म मला अर्पण करणं जमत नसेल तर त्याच्या फळाचा त्याग कर

06:44 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

सर्व भक्तांना मुक्ती मिळावी या उद्देशाने बाप्पा वरेण्याला अनेक पर्याय सांगत आहेत कारण प्रत्येक भक्तागणिक आवडनिवड बदलत जाणार हे बाप्पा ओळखून आहेत. ज्याला जो पर्याय आवडेल तो त्यानं स्वीकारावा पण काहीही करून आपला उध्दार करून घ्यावा अशी कळकळ त्यामागे आहे. प्रथम मन आणि बुद्धी मला अर्पण कर असं सांगितलं, हे दोन्ही अर्पण केलं की, भक्त स्वत:च्या विचाराने काहीही करणार नाही आणि केवळ ईश्वराच्या भक्तीवर त्याचं मन केंद्रित होईल अशी योजना त्यामागे आहे. ते जमत नसेल तर अभ्यास आणि योगाचा पर्याय सांगितला. त्यांच्यामुळे मनाचं भरकटणं बंद होऊन मन ईश्वराच्याठायी एकाग्र होईल असा उद्देश त्यामागे आहे. ज्यांना अभ्यास आणि योग जमण्यासारखा नाही त्यांना बाप्पांनी सांगितलं की, ठीक आहे अभ्यास आणि योग दोन्ही राहुदेत पण काहीतरी कर्म केल्याशिवाय तुला चैन पडणार नाही म्हणून तू असं कर की, केलेलं कर्मच मला अर्पण करून टाक. आता कर्म बाप्पांना अर्पण करायचंय म्हंटल्यावर त्याच्या हातून वाईट कर्म नक्कीच घडणार नाही आणि जे कर्म घडेल ते चांगलंच असेल. तेव्हा असं चांगलं कर्म बाप्पांना अर्पण केलं तरी त्यांची उत्तमप्रकारे भक्ती केल्यासारखंच आहे. बरं कर्म पूर्ण केलं किंवा अपूर्ण राहिलं तरी हरकत नाही कारण ते बाप्पांनाच अर्पण करायचंय म्हणजे मी कर्म करतोय म्हणजे मी कर्ता आहे या अहंकारापासून भक्त दूर रहावा असा बाप्पांचा उद्देश त्यामागे आहे. पण मनुष्यस्वभाव विचित्र असतो. मी कर्म केलंय हे त्याच्या काही केल्या डोक्यातून जात नाही. म्हणून पुढील श्लोकात बाप्पा भक्तापुढं असा पर्याय ठेवतात की, कर्म मला अर्पण करायची इच्छा तुला नाहीये ना, ठीक आहे तू त्या कर्माच्या फलाचा त्याग करून टाक.

Advertisement

अथैतदप्यनुष्ठातुं न शक्तोऽ सि तदा कुरु ।

प्रयत्नतऽ फलत्यागं त्रिविधानां हि कर्मणाम् ।। 13 ।।

अर्थ- कर्म मला अर्पण करण्यास तू समर्थ नसलास तर त्रिविध कर्माच्या फलाचा त्याग कर.

विवरण- कर्म मला अर्पण करणे जमत नसेल तर कर्माच्या फळाचा त्याग कर असे बाप्पांनी वरेण्याला आणि त्यांच्या भक्त मंडळींना सांगितले, खरं तर या दोन्ही गोष्टी अवघड आहेत कारण कर्म केल्यावर त्याचं श्रेय घेण्यासाठी माणूस आसुसलेला असतो. कित्येक वेळा तर कर्म न करताच आपल्याला फुकटचं महत्त्व कसं मिळेल याकडं माणसाचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे कर्म ईश्वराला अर्पण केल्यावर कर्म केल्याची टिमकी न वाजवता मनुष्य गप्प बसू शकत नाही. मी होतो म्हणून झालं हा अभिमान त्यातून डोकावत असतो आणि मीच हे करू शकतो असा अहंकारही त्यात दिसून येतो. बाप्पांना या सगळ्याची कल्पना आहे म्हणून ते म्हणतात, कर्म मला अर्पण करणं जमत नसेल तर त्याच्या फळाचा त्याग कर. अर्थात हे त्याहून अवघड आहे. कर्मे कायिक, वाचिक व मानसिक अशी तीन प्रकारची असतात. त्यापैकी शरीराने करावयाची, म्हणजे कायिक कर्मे मनुष्याला जास्त महत्त्वाची वाटतात. कारण त्याचे चांगले वाईट परिणाम लगेच दिसून येतात. आपल्या भक्ताच्या हातून चांगले कर्म केल्यावर त्याला त्यापासून चांगले फळ अपेक्षित असणार व तो त्याच्या मोहात गुंतून पडणार हे ओळखून बाप्पांनी फळाचा त्याग कर असा उपदेश केलेला आहे. फळाचा त्याग केल्यास आपोआपच मोह, लोभ यातून भक्तांनी मोकळं व्हावं असा बाप्पांचा उद्देश आहे. तसेच फळ बाप्पांना अर्पण करायचं आहे असं ठरवलं की, तो दुष्कर्मापासून आपोआप परावृत्त होईल अशी बाप्पांची योजना आहे. मनुष्य कायिक कर्माला जास्त महत्त्व देतो पण पुढील दोन प्रकार खरे महत्त्वाचे आहेत कारण माणसाची मन:शांती त्यावर जास्त अवलंबून असते.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article