नंदगड जॉईंट सेंट्रल स्कूलच्या समस्या त्वरित न सोडविल्यास ग्रा. पं.ला घेराव
पालकांचा इशारा : ‘जलजीवन’साठी खोदलेली चर अद्याप उघड्यावर : विद्यार्थ्यांना धोका
खानापूर : नंदगड येथील जॉईंट सेंट्रल स्कूलच्या आवारात ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत जलवाहिनी घातली गेली आहे. या कामासाठी शाळेच्या आवारात खोदाई करून पाईपलाईन घालण्यात आली होती. मात्र या पाईपलाईनच्या चरी न बुजवल्याने मैदानावर चिखल आणि चरी निर्माण झाल्या आहेत. जॉईंट स्कूलमध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मैदानावर खेळताना चिखलाचा सामना करावा लागत असून अनेकवेळा विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याकडे शाळा सुधारणा समिती आणि ग्रा. पं.ने साफ दुर्लक्ष केल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मैदान म्हणजे मद्यपींची सोय
सेंटर स्कूलच्या मैदानात कंत्राटदाराने जलजीवन मिशनचे साहित्य, जलवाहिन्या ठेवल्या आहेत. तसेच कामगारांच्या राहण्याची सोयदेखील तेथेच करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेचे मैदान मद्यपींसाठी अड्डा बनला आहे. त्यामुळे शाळेच्या पटांगणात रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे कचरा आणि मद्यपींच्यामुळे बाटली आणि ग्लास मोठ्याप्रमाणात मैदानात टाकण्यात येत आहेत. तसेच कंत्राटदाराच्या साहित्यामुळे मैदानावर मोठ्याप्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. शालेय क्रीडास्पर्धांना आता सुरुवात होणार असल्याने विद्यार्थ्यांना खेळाचा सराव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच मैदानावर झालेल्या चिखलामुळे खेळाचा सराव करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना झोनल आणि तालुकास्तरीय क्रीडास्पर्धांना मुकावे लागणार आहे.
वर्गखोल्यांत गळती
शाळा परिसरात झाडी-झुडपे वाढल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच शाळेतील वर्गखोल्याही गळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या बाबतीत अनेक समस्या असताना देखील याकडे ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, विकास अधिकारी आणि सदस्यांसह शाळा सुधारणा समितीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पालकांतून आणि नंदगड ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सेंट्रल स्कूलच्या समस्या तात्काळ न सोडविल्यास विद्यार्थ्यांसह पालकांनीं ग्राम पंचायतसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.