मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उग्र आंदोलन
हलशी धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचा निर्धार : वनखात्याकडून कोणतीच भरपाई मिळाली नसल्याची तक्रार : उपतहसीलदारांना निवेदन
वार्ताहर/गुंजी
रस्ते, वीज, प्राणी संघर्ष अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी हलशी परिसरातील शेतकऱ्यांनी हलशी क्रॉसवर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि समस्या मांडल्या. शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडला असून येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांनी ग्रासले आह.s शेतीसाठी रस्ते नाहीत. त्याचबरोबर वीजपुरवठाही सुरळीत केला जात नाही. काबाडकष्ट करून पिकविलेली शेती वन्यप्राणी खाऊन फस्त करतात. शेत राखणीस गेलेल्या शेतकऱ्यांवर जंगली प्राणी हल्ला करतात. जंगलातून शेताकडे जात असताना संरक्षणासाठी घेतलेल्या कुऱ्हाडी, कोयते, बंदूका अरण्य वनकर्मचारी काढून घेतात. नुकसान केलेल्या पिकांची भरपाई मिळत नाही.
उलट अरण्य खात्याचेच अधिकारी व कर्मचारी येथील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांपेक्षाही जास्त त्रास देतात, असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून अनेकांची शेती ओसाड बनल्याचे सांगून यात सुधारणा न झाल्यास पुढील महिन्यांमध्ये उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला. आंदोलनस्थळी पोलीस अधिकाऱ्यां व्यतिरिक्त दुपारी एक वाजेपर्यंत कोणतेच अधिकारी फिरकले नसल्याने उपस्थित शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे धरणे आंदोलनाचे रूपांतर रास्ता रोकोत करण्यात येईल, असा इशारा भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धनगौडा मोदगी यांनी देताच बिडीचे उप तहसीलदार उस्मान ताशिलदार यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन निवेदनाचा स्वीकार करून शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
नंदगड उपनिरीक्षकांचे मार्गदर्शन
पीक संरक्षक परवाना असलेल्या बंदुकीचा वापर कसा करावा आणि परवान्यासाठी काय करावे, याविषयी येथे उपस्थित असलेले नंदगड स्टेशनचे उपनिरीक्षक एस. एस. बदामी यांना एका शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी समर्पक मार्गदर्शन केले. तसेच कायद्याबद्दल विस्तृत माहिती देऊन प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीतच राहून केली गेली पाहिजे. तसेच निवडणुकीच्या काळात ज्या शेतकऱ्यांच्या बंदुका पोलीस ठाण्यात आहेत त्यांची योग्य कागदपत्रे देऊन त्या घेऊन जाव्यात. त्यासाठी आपण पूर्णपणे सहकार्य करीन, असे आश्वासन दिले. यावेळी कृषक समाजाचे तालुका अध्यक्ष अर्जुन गावडा, जिल्हा उपाध्यक्ष चांगदेव देसाई, तालुका उपाध्यक्ष नुराप्पा मादर, कार्यदर्शी संजय नरसेवाडकर, संजय सोनुलकर, पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, सदस्य पांडू फोंडेकर, अर्जुन देसाई लक्ष्मण गुरव रमेश वीर आदींसह हलशी भागातील शेतकरी उपस्थित होते.
वन अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ
हे आंदोलन मुख्यत्वे करून शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या उपद्रवाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. मात्र या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने येथील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत होता. आंदोलनस्थळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीचे झालेले नुकसानीचे फोटो आणले होते. तर काही शेतकऱ्यांनी चक्क हत्तींकडून ऊस पिकाचे नुकसान झालेले उसाचे भारे आणले होते. तसेच या भागातील शेतकऱ्यांना गेल्या दोन-तीन वर्षापासून कोणतीच नुकसानभरपाई वनखात्याकडून मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय कृषक समाजाचे जिल्हा अध्यक्ष दोंडय्या पुजेर यांनी वनखात्यावर कठोर ताशेरे ओढले आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी उपस्थित डेप्युटी तहसीलदार यांच्याकडे केली.